बिलोली (जि.नांदेड) : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (Block Development Officer) प्रकाश नाईक यांना बुधवारी (ता.दहा) दुपारी उपसभापती शंकर आधव यंकम यांनी सभापती निवासस्थानी बंद खोलीमध्ये डांबून मारहाण (Biloli Panchayat Samiti) केली. या प्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात उपसभापती यंकम यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व अन्य विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा कर्मचारी युनियनसह सर्वस्तरातून जाहीर निषेध करण्यात येत असून गुरुवारी (ता११) मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना कर्मचारी युनियनच्या वतीने निवेदन देण्यात (Nanded) आले व कामबंद आंदोलन करण्यात आले. बिलोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक हे सप्टेंबर २०१९ पासून बिलोली येथे कार्यरत आहेत. त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी शासनाच्या विविध योजना गावपातळीपर्यंत राबविण्याचा प्रयत्न केला असला तरीही त्यांच्या कार्यपद्धतीवर अनेक वेळेला लोकप्रतिनिधींसह वरिष्ठांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.
मात्र त्यांनी दिव्यांगांसाठी केंद्र शासनाचे शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीने राबवून अनेक गरजूंना लाभ मिळवून दिला. मागील सहा महिन्यांपासून पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य व गटविकास अधिकारी यामध्ये कुरबुर सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे पंचायत समितीमार्फत गावातील विकासाबाबत आलेला निधी योग्य पद्धतीने खर्च होत नसल्यामुळे लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. त्याबरोबरच गट विकास अधिकारी व कर्मचारी मुख्यालय राहत नसल्यामुळे ही अनेकांची कामे खोळंबलेली आहेत. मागील महिन्यात गटविकास अधिकाऱ्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे ते दीर्घ रजेवर होते. ते २७ ऑक्टोबर रोजी रुजू झाले. दरम्यानच्या काळात देगलूर-बिलोलीची पोटनिवडणूक सुरू असल्यामुळे त्यांनी बिलोलीला येण्याचे टाळले. शिवाय आचारसंहिता असल्यामुळे गाव पातळीवरील कामे बंद ठेवण्यात आली होती. बुधवारी (ता.१०) उपसभापती शंकर यंकम यांनी सभापती निवासस्थानी बसून गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या शासकीय कार्यालयातून बोलून घेतले. गटविकास अधिकाऱ्यांना सभापती निवासस्थानातील खोलीत डांबून त्यांना धक्काबुक्की करून मारहाण केली व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. बुधवारी दुपारी दोन वाजता उपसभापती व गटविकास अधिकारी यामध्ये झालेला हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी सदर घटनेची तक्रार कर्मचारी युनियनसह मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर व जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे केली. त्यानुसार बुधवारी रात्री दहा वाजता उपसभापती शंकर यंकम यांच्याविरोधात बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे हे करीत आहेत.
घटनेचे तीव्र पडसाद
गटविकास अधिकाऱ्यांना उपसभापतीकडून डांबून मारहाण केल्याचे घटनेचे पडसाद जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद कर्मचारी युनियनमध्ये तीव्र स्वरूपात उमटले आहेत. गुरुवारी (ता.११) सर्व संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपसभापतीविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी कामबंद आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.