नांदेड - विनापरवानगी आणि बेकायदेशिररित्या लावलेले बॅनर काढण्यासाठी गेलेल्या नांदेड वाघाळा महापालिकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच नाना नानी पार्क येथे आरोग्य कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी नांदेड वाघाळा महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. तीन) सकाळी महापालिकेसमोर काळ्या फिती लाऊन आंदोलन केले.
नांदेड वाघाळा महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर बुधवारी सकाळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लाऊन आंदोलन करत निषेध व्यक्त केला. तसेच यावेळी अटकेची मागणी करत घोषणाही देण्यात आल्या. त्यानंतर महापौर मोहिनी विजय येवनकर, आयुक्त डॉ. सुनील लहाने, स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
कारवाई करण्याची मागणी
महापालिका हद्दीत विनापरवानगी बॅनर लाऊ नयेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत त्याचबरोबर अशा बॅनरवर कारवाई करण्याच्या तसेच गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नांदेड महापालिकेच्या वतीने कारवाई करत असताना कर्मचारी रणजित पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना सोनु कल्याणकर आणि त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करून मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे याबाबत भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाना नानी पार्क येथे देखील कोरोना चाचणीचे काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात आली होती. मात्र, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला नाही. त्यामुळे या घटनांमुळे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला. बुधवारी महापालिकेसमोर काळ्या फिती लाऊन आंदोलन केले तसेच मागण्यांचे निवेदनही सादर केले.
महापौर, आयुक्तांना दिले निवेदन
महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय काम करत असताना अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर सध्या महापालिकेतर्फे मालमत्ता कर आणि पाणी कर वसुलीसह इतर करांची वसुली करण्याचे काम सुरू आहे. या वसुली दरम्यान पूर्वीप्रमाणे अडथळा होऊ नये, म्हणून महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण देण्यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना आदेश देण्यात यावेत, या व इतर मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने महापौर, आयुक्त आणि स्थायी समितीचे सभापती यांना सादर करण्यात आले.
हे झाले होते सहभागी
महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी निषेध व्यक्त करत काळ्या फिती लाऊन कामकाज केले. यावेळी उपायुक्त अजितपालसिंघ संधू, बाबूराव बिक्कड, शुभम क्यातमवार, कार्यकारी अभियंता गिरीश कदम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, शहर अभियंता माधव बाशेट्टी, सहायक आयुक्त संजय जाधव, राजेश चव्हाण, डॉ. मिर्झा बेग, सुधीर इंगोले, डॉ. रईसोद्दीन, गुलाम सादेक, सिस्टिम मॅनेजर सदाशिव पतंगे, आर. टी. सोनसळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.