नांदेड - कोरोना संसर्गाच्या काळात सुरवातीला जवळपास दीड महिना नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र, नंतर हळूहळू रुग्णसंख्या वाढत गेली आणि ११ आॅगस्टपर्यंत साडेतीन हजाराहून अधिक रुग्णसंख्या झाली आहे. त्याचबरोबर १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनही आता कोरोना रुग्णांसोबतच मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
नांदेड शहरात तब्बल एक दीड महिन्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या टप्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर शहरातील विविध भागात एक दोन रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. मे महिन्यात कोरोनाचे रुग्ण त्याचबरोबर मृत्यूही झाले. त्यामुळे मे महिन्यात नांदेडला कोरोनाचा मृत्यूदर ७.२ वर जाऊन पोहचला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती सुरु केल्यानंतर त्यात काहीअंशी यश आले असून आता आॅगस्ट महिन्यात हाच मृत्यूदर ३.५ टक्यावर येऊन पोहचला आहे.
असे झाले सामुहिक प्रयत्न
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह जनजागृतीही सुरु करण्यात आली. त्याचबरोबर विविध भागात जाऊन ज्येष्ठ नागरिकांसह आजारी असलेल्या व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. सर्व्हेक्षण करण्यात आले. सामुहिक प्रयत्नांमुळे बऱ्यापैकी प्रशासनाला यश मिळाले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्यासह अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी सुरु केलेल्या प्रयत्नातून मृत्यूदर कमी करण्यात यश मिळत आहे.
असा होता मृत्यू दर
नांदेडला मे महिन्यात ७.२ टक्के, जून महिन्यात ३.४ टक्के, जुलै महिन्यात ४.४ टक्के तर आॅगस्ट महिन्यात ३.५ टक्के असा मृत्यू दर होता. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे १२६ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत तीन हजार ५१८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यातील एक हजार ९०९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात एक हजार ४६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी मृत्यूदर हा जूनमध्ये ३.४ टक्के होता. मध्यंतरी वाढलेला मृत्यूदर हा चिंतेची बाब होती त्यामुळेच तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात आल्या होत्या.
महापालिका हद्दीत मृत्यूदर चार टक्क्यावर
नांदेड महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चार टक्क्यावर आला आहे. जूनअखेर पर्यंत तो पाच टक्क्यावर होता. महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी ॲन्टीजेन रॅपीड टेस्टद्वारे चाचण्या करण्यास सुरुवात केली. व्यापारी, दुकानदारांच्या चाचण्या घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे बराच फरक पडला आहे. उपायुक्त अजितपालसिंघ संधू, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन त्याचबरोबर महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, विभागप्रमुख आणि त्यांचे पथक युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याने मृत्यूदर कमी करण्यात यश मिळत आहे.
हेही वाचलेच पाहिजे - डेटा विज्ञान कृषी क्षेत्रात क्रांती घडवू शकतो- डॉ. पराग चिटणीस
मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर - डॉ. विपीन
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या वर येत आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी तसेच ग्रामिण भागातही कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. आरटीपीसीआर तपासणीसोबतच ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे चाचण्या करण्यात येत आहेत. दिवसभरात जवळपास तीन हजार चाचण्या होत आहेत. कोरोनाचे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे मृत्यूदराचे प्रमाणही कमी होण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे दरही ४४.७२ टक्क्यावर पोहचला आहे.
- डॉ. विपीन, जिल्हाधिकारी, नांदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.