नांदेडला १२ ते २० जुलै दरम्यान संचारबंदी होणार लागू, काय आहेत नियम, अटी वाचा... 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
Updated on

नांदेड - शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन तो रोखण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून ता. १२ जुलै ते ता. २० जुलै दरम्यान जिल्‍ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या बाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शुक्रवारी (ता. दहा) आदेश निर्गमित केले आहेत. 

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून नांदेड जिल्ह्यात कोरोना पाझिटिव्ह रुग्णांची संख्या ५४१ झाली आहे. त्याचबरोबर २४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनातर्फे गेल्या दोन दिवसापासून ‘मिशन ब्रेक द चेन’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तरी देखील रुग्णांची संख्या तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यात काही अटी व शर्थीच्या अधिन राहून संचारबंदी आदेश लागू करण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी याबाबत आदेश काढले आहेत. 

कोरोना विषाणूची साखळी तोडणे गरजेचे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमित केलेले आदेश, सूचना, निर्देशाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी विविध यंत्रणेची पथके गठित करुन तपासणी पथकाद्वारे संपूर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही या बाबी तपासून आवश्यक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यास कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी म्हणून नांदेड शहर आणि जिल्ह्यात ता. १२ जुलै रोजी मध्यरात्रीपासून ते ता. २० जुलै रोजी मध्यरात्रीपर्यंत ही मोहिम राबविण्याचे तसेच संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

यांना राहणार सवलत

संचारबंदी आदेशातून पुढील बाबी, आस्थापना, व्यक्ती व समुहाला सूट राहील. 
१) सर्व शासकीय कार्यालये, त्यांचे कर्मचारी, त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असेल. 
२) सर्व शासकीय व खासगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी वैद्यकीय अत्यावश्यक सर्व सेवा तसेच पशुवैद्यकीय दवाखाने व औषधालये.
३) प्रिंट व इलेक्ट्रानिक मीडिया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वर्तमानपत्र वितरक यांचा घरपोट वर्तमानपत्र वाटपासाठी.
४)  रेशन, रास्त भाव दुकाने हे सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीसाठी 
५)आठवडी बाजार व भाजीपाला, फळ मार्केट बंद राहतील तथापी भाजीपाला व फळे विक्री एका ठिकाणी न थांबता हातगाडेवर गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्ये जाऊन सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत घरपोच विक्री करता येईल. 
६) दूध विक्रेत्यांना एका ठिकाणी थांबून दूध विक्री करता येणार नाही. त्यांना सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत घरपोच विक्री करता येईल. 
७) जारद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्यांना सकाळी सात ते अकरा या वेळेत घरपोच सेवा देता येईल.
८) घरगुती गॅस घरपोच सेवा सकाळी सात ते दुपारी दोन राहील. 
९) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हा न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी यांना न्यायालयीन कामकाजासाठई परवानगी असेल. 
१०) विद्युत सेवा, मोबाईल टॉवर, दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्या, आस्थापना व त्यांचे कर्मचारी वाहनांना विभाग प्रमुखांच्या ओळखपत्राआधारे परवानगी राहील. 
११) पेट्रोल व डिझेलपंप चालू राहतील तथापी तेथील कर्मचारी यांना कंपनीचे गणवेश व ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील. १२) नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करुन वापरणे बंधनकारक राहील. 
१३) खत विक्री, बि बियाणे विक्री व वाहतूक त्यांचे गोदाम, दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीत सुरु राहतील., कापूस, मका खरेदी केंद्र सुरु राहतील.  
१४) शेतीच्या पेरणी व मशागतीस संपूर्ण कामास मुभा राहील.
१५) मालवाहतूक सेवा पुर्ववत चालू राहील.
१६) औद्योगिक कारखाने सुरु राहतील. तेथील कामगार, कर्मचारी यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था संबंधित उद्योजक, कारखानदारांनी त्याच ठइकाणी करण्याच्या अटीवर.
१७) बॅंकेत केवळ अत्यावश्यक सेवांतर्गत शासनखाती चलनद्वारे रक्कम भरुन घेण्याच्या कामास व बॅंकेचे स्वतःचे कार्यालयीन कामास मुभा राहील. तसेच इतर व्यवहाराच्या अनुषंगाने दहा पेक्षा जास्त ग्राहक असणार नाहीत, याची शाखा व्यवस्थापकांनी पूर्व दिलेल्या अटी व शर्तीनुसार नियोजन करावे. 
१८) जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी व जिल्ह्यात प्रवेशासाठी केवळ वैद्यकीय व अत्यावश्यक कारणांशिवाय ई - पास आधारेच प्रवासाची मुभा राहील. 
१९) अंत्यिधीची प्रक्रिया पार पाडण्यास पूर्वी दिलेल्या अटी व शर्तीनुसार परवानगी राहील. 

संबंधित यंत्रणेस केले प्राधिकृत
निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही, या बाबी तपासून आवश्यक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यास पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्यात येत आहे. महापालिका हद्दीत महापालिका व पोलिस विभाग यांची संयुक्त पथके गठीत करावीत, नगरपालिका हद्दीत नगरपालिका आणि पोलिस विभाग यांची संयुक्त पथके गठीत करावीत आणि गावपातळीवर ग्रामपंचायत आणि पोलिस विभागाची संयुक्त पथके गठीत करावीत. पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर करावीत. त्यांची संनियंत्रणाची जबाबदारी असेल. 

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
सदरील आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यावश्यक साधने व सुविधा यांची साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करावी. तसेच या आदेशांची अंमलबजावणी करत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध कुठल्‍याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात नमूद केले आहे.       

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.