लॉकडाउनमध्ये फासली नात्यांना काळीमा, घरातच...

file photo
file photo
Updated on

नांदेड : सध्याच्या काळात विभक्त कुटुंब पध्दती, मोठ्या व्यक्तीचा दबदबा राहिला नाही, नशापाणी, अनैतीक संबंध यामुळे खून किंवा अत्याचार, खूनाचा प्रयत्न, छळ या घटनांमध्ये कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात मागील तीन महिण्यापासून नात्यातील खूनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. गुन्हेगार उजळमाथ्याने फिरत असल्याने पोलिस व न्यायव्यवस्थेचा कुठेतरी वचक कमी झाल्याचे पहावयास मिळत आहे. 

जिल्‍ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात मुलाने बापाचा, पित्याने मुलीचा, पतीने पत्नीचा, नाताने आजीचा, सुनेने सासुचा, आईने मुलाचा, शिष्याने गुरूचा, मित्राने मित्राचा खून केला आहे. यात नागठाणा (ता. उमरी), बोंढार (ता. नांदेड), मुखेड, लिंबगाव, रामतिर्थ, उमरी येथील घटनांचा सहभाग आहे. वाढत्या घटना ह्या अनैतीक संबंध, नशा, पैशाचे देणेघेणे, सततच त्रास, मी पणा ही महत्वाची कारणे आहेत. एकंदरीत या घटना कानावर पडताच समाजमन सुन्न झाले आहे. पुढे या घटनांचा शोध लावून पोलिस आरोपीना अटक करून न्यायालयात हजर करतील तर खऱ्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. अशा तिखट प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. 

विविध कारणामुळे नात्यात दुरावा

स्वातंत्र्यानंतर सर्वसाधारण माणसाला कायदा समजण्यासाठी जास्त ओढ वाढते. परंतु फौजदारी कायदा सामान्य माणसांपेक्षा गुन्हेगारांना जास्त अवगत असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे आजच्या स्थितीत रक्त संबंधित नात्यांमधील दुरावा व एकमेकांचा द्वेष, विभक्त कुटुंबपद्धती आपापल्यामधील विविध कारणावरून होणारे भेदभाव व आजच्या परिस्थितीत म्हणजेच आपल्या देशाने स्विकारलेले आर्थिक धोरण, मूलभूत गरजामुळे होणारी चढाओढ या विविध कारणांमुळे समाजात गुन्हेगारी स्वरूपाची अराजकता निर्माण झाली आहे. 

नात्या- गोत्यामध्ये सामंजस्यपणाचा अभाव 

भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात होती. त्यामुळे कुटुंबप्रमुख हे जे निर्णय घेतील ते सर्वांसाठी मान्य असायचे. कारण ते निर्णय कधीच चुकीचा घेत नसत. त्यामुळे त्या कुटुंबात एकसूत्रीपणा असायचा. रक्त संबंधित नाते घट्ट असायचे. द्वेष फार कमी व्हायचा, त्यामुळे गुन्हेगारी वृत्ती नसायची.

पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्था 

आजच्या स्थितीत जी गुन्हेगारी वाढते आहे त्यास पोलिस प्रशासनही तेवढेच जबाबदार आहे. आजच्या काळात गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा मित्र हा पोलीस झाला आहे. एखादी घटना किंवा गुन्हा समाजात घडला की पूर्वनियोजित कट कारस्थान पोलीस प्रशासनातील काही अधिकारी हे अप्रत्यक्षरीत्या सहभागी असतात. घटनेची सत्य व खरी चौकशी न करता एखादी घटना गुन्हेगार घडवून आणतो त्याला साथ देऊन आरोपीविरुद्ध फिर्यादीचा गुन्हा दाखल करून घेण्याऐवजी आरोपी व फिर्यादी यांना एकमेकाविरुद्ध परस्परविरुद्ध तक्रार करण्यास भाग पाडतात. तसे न केल्यास तपास एकतर्फी बाजू घेऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करतात. 

लोकांचा विश्‍वास फक्त न्यायालयावर

अनेक वेळा न्यायालयात दाखल प्रकरणात आरोपी व फिर्यादी यांना वाद मिटवून घेण्याचा सल्ला दिल्या जातो. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा विधी प्राधिकरण हे समान उपयोगी कार्यक्रम राबवते. मात्र या कार्यक्रमात न्यायाधीश हे स्वतः न्याय देवता आहे. ते गावातील सर्वसामान्य लोकांसोबत जेंव्हा चर्चा करतात तेंव्हा त्यांना कोण व्यक्ती गुन्हेगार आहे हे माहीत नसते. सांगायचे म्हणजे न्यायालयाचा दबदबा कायम राहत नाही. म्हणून गुन्हेगारीवृत्ती कुटुंबा- कुटुंबामध्ये व रक्त संबंधित नात्यांमध्ये सध्या वाढताना दिसून येत असल्याचे जिल्हा अभिवक्ता संघाचे उपाध्यक्ष ॲड. जगजीवन भेदे यांनी सांगितले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.