डॉ. आर. डी. साबळे : एक बहुपेडी व्यक्तीमत्त्व- डॉ. जगदीश कदम

file photo
file photo
Updated on

नांदेड : यशवंत महाविद्यालयातील निवृत्त राज्यशास्त्र विभाप्रमुख तथा आंतरराष्ट्रीय संबंधावर भाष्य करणारे राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक,लेखक डॉ. आर. डी. साबळे यांचे निधन झाले आहे. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात सरांनी वयाची ऐंशी वर्ष पूर्ण केल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम यांनी लिहिलेला हा लेख.

डॉ. आर. डी. ऊर्फ राजकुमार साबळे सरांचा आणि आमचा खूप जुना परिचय आहे. साधारणत: १९७९ पासून आम्ही सरांना ओळखतो. तेव्हा ते गुरुद्वा-याजवळ राहात असत. आम्ही त्यांच्याकडे जाऊन चर्चा करायचो. आम्ही नुकतेच यशवंत महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून लागलो होतो. याच महाविद्यालयात प्रा. साबळे हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नुकतेच रुजू झाले होते. एक अत्यंत अभ्यासू आणि आपल्या विषयात निष्णात प्राध्यापक म्हणून अल्पावधीतच ते ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्र वीज मंडळात काही वर्ष नोकरी करून ते अध्यापन क्षेत्रात आले होते.त्यामुळे या क्षेत्राविषयी ते कमालीचे दक्ष आणि काटेकोर होते. 

उत्तम टाचण म्हणजे नोट्स वगैरे काढून तयारीनिशी वर्गावर जाणे ही त्याकाळातील प्राध्यापकांची शिस्त असे. ती साबळे सरांकडे होती. आपला विषय स्वच्छपणे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचवीत असत. त्यामुळे एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणूनही त्यांचा लौकिक होऊ लागलेला होता. साबळे सर आणि आम्ही यशवंत महाविद्यालयाच्या प्राध्यापक निवासातील एकाच इमारतीत राहायला होतो. तेथे सरांकडे येणे- जाणे व्हायचे. अनेकविध विषयांवर चर्चा व्हायची. सौ.साबळे वहिनी आणि आमच्या सौभाग्यवती यांच्यात सलोख्याचे संबंध होते, आजही आहेत. त्यामुळे सरांचा मुलगा अजित ज्याला आम्ही भैय्या म्हणतो आणि कन्या रजनीजी आमच्या मुलाची आवडती आक्कुताई आहे हे सर्वजण खूप आत्मीय संबंधातील आहेत.

डॉ. आर. डी. साबळे सर यांचा राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास केवळ उत्तमच नव्हता तर परिपूर्ण होता. देश- विदेशांतील आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अनुषंगाने त्यांचे ज्ञान नेहमी अद्ययावत असे.आज सुध्दा भारत आणि चीन यांच्यातील संबंधांच्या दृष्टीने ते अनेक मुद्दे अचूकपणे मांडतात.त्यांचा या अभ्यासाचा फायदा विद्यार्थ्यांना तर होतच असे; परंतु अनेक राजकीय मंडळी सुध्दा त्यांच्याशी चर्चा करीत असत. विशेषत: प्राचार्य गो. रा. म्हैसेकर, प्रा. रावसाहेब शेंदारकर यांच्या माध्यमातून माजी केंद्रीय गृहमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्याशी त्यांनी अनेकदा चर्चा केलेली होती.

डॉ. साबळे सर हे खरे तर डाव्या विचारसरणीचे आहेत. या चळवळीत त्यांचे अनेक मित्र आहेत. रॉयिस्ट विचारसरणीचा सुध्दा त्यांच्यावर प्रभाव आहे. या विषयावर गोदातीर समाचारचे संस्थापक, संपादक देवीदासराव रसाळ यांच्याशी चर्चा करताना आम्ही त्या चर्चेचे साक्षीदार आहोत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वर त्यांचे मुलभूत चिंतन आहे. गांधी हा त्यांचा आस्था विषय आहे. त्यामुळे एकेकाळी निवडणुकीच्या काळात कॉंग्रेस पक्षाच्या सभांमधून बोलताना आम्ही त्यांना पाहिले आहे. असे असले तरी डॉ. बाळकृष्ण कवठेकर यांच्या सारखा हिंदुत्ववादी विचारसरणीचा लेखक त्यांचा मित्र आहे. व्यक्तीगत पातळीवर वैचारिक मतभेद असणे ही बाब त्यांच्या मैत्रीआड येत नाही. या संदर्भात सरांशी आम्ही एकदोनदा बोललो सुध्दा. तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर लक्षात घेण्यासारखे आहे. आपण एकमेकांचे विचार स्वातंत्र्य मान्य केले पाहिजे. त्याशिवाय लोकशाही राष्ट्राची संकल्पना साकार होऊ शकणार नाही,असे त्यांना वाटते.

संत बसवेश्वर यांच्यापासून पेरियार, बाबासाहेब अशा अनेक विषयांवर साबळे सर उत्तम मांडणी करतात. बुध्दीवादी आणि विज्ञाननिष्ठ समाजाचा आग्रह धरतात.परंतु हे करताना कोणाचा वैयक्तिक श्रध्दाभाव दुखावणार नाही याची काळजी घेतात. प्रत्येकाला श्रध्दाभाव जपण्याचे आणि अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे आणि ते कोणी हिरावून घेण्याचे कारण नाही असे त्यांना वाटते. वैचारिक मतभेद असणे हे सुजाण समाजाचे लक्षण असते. त्यासाठी सहिष्णू असणे गरजेचे आहे, असे ते म्हणतात. कोणताही राष्ट्रपुरूष जातीत विभागला जाणे ही इथल्या समाजाची फार मोठी शोकांतिका आहे, असे ते तळमळीने सांगतात.

डॉ. साबळे सरांचे व्याख्यान ऐकणे हा एक सुखद अनुभव असतो. कुठल्याही विषयाला मिस्कीलपणाची झालर देत ते मांडणी करतात. त्यामुळे कितीही गंभीर विषय असला तरी तो किचकट आणि रटाळ वाटत नाही. राज्यशास्त्रावरील अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संबंधांवर त्यांनी केलेले लेखन अभ्यासकांना उपयुक्त ठरले आहे. त्यांचे वाचन- लेखन सतत चालू असते. त्यांच्या 'समन्वय' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात गतवर्षी आम्ही बोललो. प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, डॉ. भगवान अंजनीकर, प्राचार्य डॉ. ए. एन. जाधव हे आमच्या सोबत होते. वयाच्या ८० व्या वर्षी सुध्दा त्यांचे लेखनसातत्य चालू आहे. कायद्याची परीक्षा देऊन सर नुसते एल. एल. एम. झाले नाहीत तर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही त्यांनी आपल्या ज्ञान आणि अनुभवाचा लाभ दिलेला आहे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे परप्रांतीय विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र शिकविणारा विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणूनही त्यांचा लौकिक विद्यापीठ परिक्षेत्रात ठळक राहिलेला आहे. डॉ. अजय गव्हाणे, डॉ. कविता सोनकांबळे हे सरांचे एकेकाळचे विद्यार्थी, सहकारी सरांचे उत्तरदायित्व उत्तम रीतीने सांभाळीत आहेत.

संगीत, साहित्य, शास्त्र अशा अनेक विषयांत साबळे सरांना रुची आहे. मराठीतील उत्तमोत्तम पुस्तके त्यांनी वाचलेली आहेत. एकंदरीत डॉ. साबळे सरांचे व्यक्तीमत्त्व हे बहुपेडी आहे. डॉ. आर. डी. साबळे सर यांचे निधन झाल्याची बातमी समजली. डॉ. साबळे सरांचे निधन ही सर्वांना धक्का देणारी वार्ता आहे. कोरोनाकाळात एका विचारवंत, अभ्यासकाचे जाणे ही अस्वस्थ करणारी घटना आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!

- डॉ जगदीश कदम, नांदेड ( यांच्या फेसबुकवरुन साभार) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.