नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी- २०२० परीक्षा सुरळीतपणे चालू आहेत. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नव्यानेच अवलंबविलेल्या क्लस्टर (महाविद्यालयाचा समूह) पद्धतीचा यशस्वी प्रयोग. सर्व अभ्यासक्रमाचे एकूण एक लाख साठ हजार विद्यार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन द्वारे १२० परीक्षा केंद्रावर देत आहेत परीक्षा.
कोव्हीड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून व विद्यार्थ्यांच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य देऊन प्रचलित लेखी परीक्षा न घेता नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून नवीन परीक्षा पद्धतीनुसार सदर परीक्षा चालू आहेत. यावर्षी नव्यानेच क्लस्टर पद्धतीचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये काही महाविद्यालयांनी एकत्र येऊन परीक्षा घ्यावयची आहेत. अंतिम वर्षाच्या किंवा सत्राच्या परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षा या महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात येत आहेत. महाविद्यालयाच्या एका समूहाने एकत्र येऊन विद्यापीठाच्या मदतीने परीक्षेचे नियोजन करीत आहेत. बऱ्याच अभ्यासक्रमाच्या पदवी स्तरावरील अंतिम वर्षाच्या व सत्राच्या परीक्षा ता. १६ मार्चपासून सुरु झालेल्या आहेत. तर पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या आणि सत्राच्या परीक्षा या ता. २१ ते ता. ३१ मार्च दरम्यान घेण्यात येणार आहेत. या सर्व परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात येत आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन प्रोक्टोर्ड मेथडने तर ऑफलाईन पद्धतीने ओ. एम. आर. उत्तरपुस्तिकेद्वारे विद्यापीठाने निर्धारित केलेल्या १२० परीक्षा केंद्रावर या परीक्षा चालू आहेत.
ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणे बाबतचा पर्याय संमती पत्राद्वारे भरून दिला आहे. त्याच विद्यार्थ्याला घरी बसून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देता येणार आहे. यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास पर्याय बदलून दिला जाणार नाही. ऑनलाईन परीक्षेदरम्यान काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्यांना वाढून दिला जाणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने परीक्षा वेळापत्रकानुसार एकाच वेळेस सुरू होतील आणि त्याचा कालावधी एक तासाचा असणार आहे.
पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी प्रश्न पत्रिकाही बहुपर्यायी पद्धतीची असणार आहे. ज्यामध्ये ४० प्रश्न ४० गुणांचे असणार आहेत. पदव्युत्तर व व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा ४० गुणांची असणार आहे. पण ५० प्रश्न असणार आहेत त्यापैकी ४० प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. हिवाळी- २०२० मधिल सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना गुणपडताळणी (रिकाऊटिंग) करण्याची संधी सशुल्क देण्यात येणार आहे. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.