कोरोनामुळे नांदेड वाघाळा महापालिकेसमोर आर्थिक संकट ! 

नांदेड वाघाळा महापालिका
नांदेड वाघाळा महापालिका
Updated on

नांदेड - कोरोना संसर्गाचा फटका जसा अनेकांना बसला आहे तसाच नांदेड वाघाळा महापालिकेलाही बसला आहे. महापालिकेवरही आर्थिक संकट ओढावले असून आर्थिक महसुली उत्पन्न घटले आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना विभाग तसेच इतर विभागातर्फे मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आता प्रशासनाने उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. 

गेल्या २०१६ - २०१७ या वर्षापासून महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा अभ्यास केला असता अपेक्षित उत्पन्नापेक्षा जास्तीचे उत्पन्न अंदाजित धरुन अंदाजपत्रक तयार करण्यात येत असल्यामुळे प्रत्येक वर्षी दायित्वातही वाढ झाली आहे. गेल्या चार ते पाच वर्षात प्रत्यक्ष महसुली उत्पन्न हे १७८ कोटी ते दोनशे कोटीच्या घरात आहे तर प्रत्यक्ष महसूली खर्च हा १७० कोटी ते २०७ कोटीच्या घरात आहे. त्यातच आता यंदाच्या वर्षी २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग आल्यामुळे आणखी अडचणीत भर पडली आहे. 

अनेक अडचणी आणि समस्या

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांचे वेतन करण्यासाठी दर महिन्याला साडेपाच कोटी रुपये खर्च आहे. त्याचबरोबर सेवानिवृत्तांच्या पेन्शनसाठी एक कोटी ८५ लाख रुपये द्यावे लागतात. त्याचबरोबर घेतलेल्या कर्जाचे हफ्ते आणि मुद्दल फेडावे लागते. त्यामुळे खर्च आणि उत्पन्न यांचा मेळ घातलाना प्रशासनाला अनेक अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या जीएसटीच्या मिळणाऱ्या अनुदानातून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन होत आहे. त्याचबरोबर चौदाव्या वित्त आयोगातून स्वच्छता आणि साफसफाईचा इतर कामांसाठी निधी वापरण्यात येत आहे. 

महापालिकेचे उत्पन्न कमी

कोरोना संसर्ग सुरु असल्यामुळे नांदेड महापालिका प्रशासनाला सध्या विविध करांची वसुली करण्यासाठी अडचणी येत आहेत. नागरिकांकडेही सध्या पैशाची चणचण असल्यामुळे विविध करांचा भरणा देखील बऱ्यापैकी कमी झाला आहे. महापालिकेचे उत्पन्न त्यामुळे कमी झाले असून त्यानुसार खर्चासाठी देखील हात आखडता घ्यावा लागत आहे. विकासकामे तर सध्या बंदच आहेत पण दैनंदिन आहे ती छोटी मोठी अत्यावश्यक कामे करताना देखील अनंत अडचणींना प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे. 
 
कोरोनाच्या काळातील प्राप्त महसुली उत्पन्न 

महापालिकेचे एकूण अपेक्षित उत्पन्न - १८० कोटी 

  • प्रकार - वार्षिक उत्पन्न - प्रत्यक्ष जमा 
  • मालमत्ता कर - ६० कोटी - सहा कोटी 
  • जीएसटी - ८५ कोटी - ४५ कोटी 
  • मुद्रांक शुल्क - सात कोटी - नाही 
  • पाणीपट्टी - ११ कोटी - ५३ लाख 
  • नगररचना विभाग - १५ कोटी - अडीच कोटी 
  • मालमत्ता भाडे - दीड कोटी - ५० लाख 

२०५ कोटींची देणी 
नांदेड वाघाळा महापालिकेला सध्या २०५ कोटी रुपयांची देणी आहेत. त्यामध्ये १०५ कोटी रुपयांचे कर्ज असून त्याचा दर तीन महिन्याला सहा कोटी ८० लाख रुपयांचा हफ्ता (व्याज व मुद्दल मिळून) पालिकेला द्यावा लागतो. त्याचबरोबर महावितरणशी संबंधित ३५ कोटी, विविध कामांसाठी कंत्राटदार, पुरवठादारांची देणी ४५ कोटी तर इतर जवळपास १५ कोटी रुपयांची देणी आहेत. 

शास्ती माफीची योजनाही लागू

कोरोना संसर्गामुळे गेल्या सहा महिन्यापासून महापालिकेची यंत्रणा प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या कामात गुंतली आहे. मनुष्यबळाचा तिकडेच वापर होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम विविध करांच्या वसुलीवर झाला आहे. दरम्यान, विविध करांच्या वसुलीसाठी नियोजन करण्यात येत आहे. मालमत्ता कराची मागणी बिले तयार करण्यात येत असून ती वाटप करण्यात येत आहेत. शास्ती माफीची योजनाही लागू केली आहे. नागरिकांनी देखील विविध करांचा भरणा वेळेवर भरुन सहकार्य करावे. 
- डॉ. सुनील लहाने, आयुक्त.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.