लोहा ( जिल्हा नांदेड ) : लोहा शहर व तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोह्यातील पहिल्याच दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. ( ता. १९ ते २३ ) मार्चपर्यंत पाच दिवस हा जनता कर्फ्यू लावल्यामुळे हातगाडीवाले, व्यवसायिक, भाजीपाला, हॉटेल्स आणि बाजारपेठ यावर निर्बंध आणल्यामुळे सामान्य नागरिकांची ससेहोलपट झाली. जनता कर्फ्यु तीन दिवसाचा असावा असे नागरिकांतून बोलले जात होते. पोलिस गस्त, नगरपालिकेचे ध्वनिक्षेपकावरून वारंवार मास्क आणि सुरक्षित अंतराच्या दिल्या जाणाऱ्या सूचना एवढाच काय तो आवाज मुख्य रस्त्यावरून घुमत होता.
गत वर्षी चीनमधून आलेल्या कोरोना या संसर्गजन्य महामारी रोगाने आपल्या देशासहित संपूर्ण जगात हाहाकार माजविला. त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. याचा प्रादुर्भाव लोहा तालुक्यात होत आहे. लोहा शहर आणि तालुक्यात कोरोनाच्या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
गत फेब्रुवारी ते आता चालू मार्च महिन्यामध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे याची चिंता व्यक्त होत आहे. लोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी महसूल विभाग, पोलिस प्रशासन, वाहतूक व्यवस्था, व्यापारी यांची नुकतीच एक बैठक बोलावून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे त्यांनी (ता. १७ ) लोहा नगर परिषदेच्या सभागृहांमध्ये लोहा शहरातील व्यापारी नागरिक यांची बैठक बोलावून कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी व टाळण्यासाठी व कोरोनाला हरवण्यासाठी खुल्या चर्चेचे व उपाययोजनेचे आव्हान केले होते.
यावेळी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, पोलिस निरीक्षक भागवत जायभाये, गटनेते करीम शेख, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, अमोल व्यवहारे, संभाजी पाटील चव्हाण, केतन खिल्लारे, नारायण येलरवाड, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश सावकार तेललवार, पालीमकर, मुकुंदराज पाटील काळे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, नगर पालीकेचे कर्मचारी उपस्थित होते.
लोहा शहरातील व तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी. किराणा दुकान, कापड दुकान, सिमेंट दुकान, जनरल. स्टोअर्स, हॉटेल्स, भाजी पाला,फळ विक्रीसह आठवडी बाजार शाळा- कॉलेज खाजगी कोचिंग क्लासेस आदी सर्वच बाजार पेठ बंद रहाणार आहे.
रस्त्यावर फिरणाऱ्यांना दिला चोप !
कुतूहलापोटी रस्त्यावर फिरणाऱ्या टोळक्यांना पोलीस प्रशासनाने बोलावून घेऊन चोप दिला. दुपारनंतर रस्त्या रस्त्यावर फिरणाऱ्या झुंडी पोलिसांच्या कारवाईमुळे कमी झाल्याचे दिसून आले. दिवसभर शहरातील बाजारपेठ बंद असल्यामुळे बहुतांश तरुणांनी क्रिकेटचे मैदान जवळ केले. शहरातील अत्यावश्यक असणाऱ्या आरोग्य सेवा आणि औषधी दुकान एवढेच काय ते उघडे होते.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.