स्वातंत्र्यदिन : नांदेडला बनविलेला तिरंगा फडकतो सोळा राज्यांत, पण...

File photo
File photo
Updated on

नांदेड : खादी हे केवळ कापड नसून तो एक राष्ट्रीय विचार आहे. याच विचारातून खादीपासून तयार केलेल्या राष्ट्रध्वज देशभरात फडकवला जातो. नांदेडमध्ये खादीपासून तयार केलेला राष्ट्रध्वज सोळा राज्यांमध्ये जातो. यंदा कोरोनामुळे राष्ट्रध्वज निर्मितीला ब्रेक लागला आहे. यंदा केवळ नऊ राज्यांमध्येच राष्ट्रध्वज पाठवल्याची माहिती मराठवाडा खादी ग्रामोद्योगचे महाव्यवस्थापक अरुण किनगावकर यांनी दिली.

खादी ग्रामोद्योग मंडळाकडून हुबळी (कर्नाटक) आणि नांदेड या दोनच ठिकाणी राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते. या ठिकाणांहून तयार झालेले राष्ट्रध्वज देशाच्य विविध राज्यांत पाठविले जातात. विशेष म्हणजे नांदेडमध्ये तयार झालेला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावरही डौलाने फडकतो. नांदेडमध्ये विविध आकारांतील राष्ट्रध्वज तयार केले जातात. सर्वात मोठा १४ बाय २१ फुट आकाराचा असतो. अन्य ध्वज आठ बाय २१ फूट, सहा बाय नऊ फूट, चार बाय नऊ फूट, तीन बाय साडेचार फूट, दोन बाय तीन फूट तसेच साडेसहा इंच बाय नऊ इंच आकाराचे बनविले जातात. 

नांदेडमध्ये खादी मंडळामध्ये सुमारे १०० कर्मचाऱ्यांच्या हातून राष्ट्रध्वज निर्मिती होते. खादी ग्रामोद्योग मंडळाकडून २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १५ आॅगस्ट (स्वातंत्र्यदिन), एक मे (महाराष्ट्र दिन) या महत्त्वाच्या दिवसांसाठी तिरंगा ध्वजनिर्मितीचे काम वर्षभर सुरु असते. यातून खादी समितीला दरवर्षी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळते.

यंदा केवळ ३४ लाखांचे उत्पन्न
यंदा लाॅकडाउनचा फटका सर्वच उद्योग, व्यवहारांना बसला आहे. १५ आॅगस्टसाठी ध्वजनिर्मितीच्या कामांत अनेक अडथळे आले. यंदा १५ आॅगस्टसाठी ७८३ राष्ट्रध्वज तयार करण्यात आले. त्यातून ३४ लाखांचे उत्पन्न मंडळाला मिळाले आहे.

कापड येते उद्‍गीरमधून
राष्ट्रध्वजाच्या निर्मितीचे केंद्र नांदेडमध्ये असून, सुमारे शंभर लोकांच्या हाताला काम मिळत आहे. उद्‍गीर (जि.लातूर) येथून ध्वजाचे कापड आणून नांदेडमध्ये ध्वजाची निर्मिती केली जाते. मात्र, यंदा कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. पर्यायाने ध्वजाची मागणीही कमी झाली आहे. याचा फटका खादी ग्रामोद्योगाच्या उत्पन्नाला बसला आहे. यंदा ६० टक्के उत्पन्नात घट झाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अगदी शेजारच्या जिल्ह्यांतही तिरंगा पाठविण्याचा आम्हाला अडचणी आल्याचे मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळाचे महाव्यवस्थापक अरुण किनगावकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.