स्वराज्य संस्थापिका : राष्ट्रमाता जिजाऊ

rajmata jijau.jpg
rajmata jijau.jpg
Updated on

नांदेड : स्वराज्याच्या दोन छत्रपतींना घडविणा-या राष्ट्रमाता जिजाऊ या केवळ आदर्श माता नव्हत्या तर वीरकन्या, वीरपत्नी, धिरोदात्त राजमाता होत्या. त्या शस्त्र, शास्त्र पारंगत, राज्य कारभार कुशल होत्या. त्यांच्या मार्गदर्शनानेच शिवरायांनी अठरापगड जातीतल्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे स्वराज्य उभारले. अशा राजमातेचा बुधवारी ता. १७ जून रोजी स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार यांनी लिहीलेला लेख प्रकाशित करीत आहोत.

१२ जानेवारी १५९८ रोजी जन्म 
सिंदखेड राजा येथील लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी ता. १२ जानेवारी १५९८ रोजी एक कन्यारत्न जन्माला आले. त्या कन्येचे नाव जिजाबाई असे ठेवले होते. लखुजी जाधव हे निजामशाहीमध्ये जहांगीरदार होते. तर त्यांचे चार पुत्र म्हणजेच जिजाबाईंचे भाऊ दत्ताजी, अचलोजी, राघोजी, बहादुरजी हे देखील निजामशाहीमध्ये सरदार होते. अशा शौर्यवान घराण्यात जिजाबाई यांचे संगोपन झाले. त्यामुळे मुलगी असूनही त्यांना शस्त्र आणि शास्त्राचे देखील शिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे जिजाऊमध्ये बालवयापासूनच राजकीय महत्वाकांक्षा होती. माँ जिजाऊ मध्ये करारीपणा, आत्मविश्वास, करुणा, मुत्सद्दीपणा, तीव्र आत्मसंयम, कणखर मनोवृत्ती, तल्लख बुद्धीमत्त्ता, निस्वार्थ वृत्ती, स्वाभिमानी, मानवतावादी, विज्ञानवादी, परिवर्तनवादी विचार अशा अनेक गुणांचा जीवित संगम होता.

शहाजीराजे यांच्यांशी १६०५ मध्ये विवाह 
पुढे जिजाबाईंचा विवाह देवगीरीचे मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजीराजे यांच्यांशी सन १६०५ साली झाला.
ज्या काळात स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे स्वतंत्र नव्हते तोव्हां कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, स्वत:चे मत व्यक्त करण्याचा अधिकार नव्हता, तिला केवळ चूल आणि मुल यामध्येच गुरफटून ठेवले गेले होते. अशा काळात हि वीरमाता मात्र या देशातील अन्याय व अत्याचार मातीत गाढण्याचे स्वप्न पाहत होती. 

६ जून १६७४ रोजी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण
या देशात राजकीय आणि धार्मिक गुलामगीरीने धुमाकूळ माजवला होता. त्यामुळे येथे माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच उरला नव्हता. या भीषण परिस्थितीचे अवलोकन करून जिजाऊंना वाटायचे कि, या दोन्ही गुलामींचा मुकाबला करून आपणच येथील माणसांना गुलामीतून मुक्त करावे. शहाजी राजे व लखुजीराजे यांना एकत्र आणून मुघल सत्तेला शह देण्याची योजना जिजाऊ आखत होत्या. परंतु दुर्दैवाने लखुजीराजांना विश्वासघाताने ठार मारले गेले. स्वत:चे वडील व चार भावांना गमावल्यानंतर खचून न जाता जिजाऊ मोठ्या त्वेषाने पुढे सरसावत शहाजीराजांच्या खांद्याला खांदा देऊन स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होवू शकले नाही. पण राज्यातील सर्वसामान्य रयतेच्या जीवनातील दु:ख संपवून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे व आनंदाचे हास्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करून त्यासाठी स्वत:च्या मुलाला अनेक वेळा जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ देवून आदर्श संस्काराच्या व भक्कम प्रेरणेच्या बळावरच शिवरायांचा ता. ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक करून घेतला आणि या महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले.

प्रत्येक घरात शिवाजी निर्माण करू शकतो
वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता, वीर आज्जी अशा अनेक भूमिका यशस्वी पणे पेलणारी वीरांगना, वीरनायिका म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ म्हणूनच, आज जिजाऊचे विचारच या देशात प्रत्येक घरात शिवाजी निर्माण करू शकतो. त्यासाठी आमच्या आजच्या मातांनी हा विचार अंगीकारावा, तो आत्मसात करून त्या विचारानुसार आपली वाटचाल करावी. त्यांचा विचार जिवंत ठेवणे हेच खऱ्या अर्थाने या मातेसाठी अभिवादन ठरेल.

बहुजन समाजाला जोडण्याचे काम
जिजाऊंचीच प्रेरणा घेऊन आज मराठा सेवा संघ अॅड. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. वेगवेगळ्या जाती-धर्मातील महापुरूषांचे विचार एकत्र करीत बहुजन समाजाला जोडण्याचे काम मागील तीस वर्षापासून सुरू आहे. जिजाऊंच्या समाधीस्थळी दरवर्षी ता. १७ जून रोजी राज्यभरातील मावळे एकत्र होऊन ते जिजाऊंना नमन करतात, जिजाऊ वंदना गातात आणि जिजाऊंची प्रेरणा घेतात. जिजाऊंचा स्मृतीदिन त्यानिमित्त त्यांना विनंम्र अभिवादन ...!

- शिवश्री कामाजी पवार,
राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवा संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.