चांगली बातमी : महाराष्ट्र- तेलंगणा जोडणाऱ्या पुलासाठी १८८ कोटीचा निधी; नितीन गडकरी यांची घोषणा

file photo
file photo
Updated on

बिलोली (जिल्हा नांदेड) : महाराष्ट्र तेलंगणा सीमेलगत असलेल्या मांजरा नदीपात्रातील येसगी या गावाजवळ नवीन पूल उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १८८ कोटी ६९ लाखांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केल्यामुळे दोन्ही राज्याच्या सीमेला जोडणारा नवीन पूल अस्तित्वात येणार आहे. ३५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला पूल नदीतील अवैध रेतीच्या वाहतुकीमुळे कोलमडून पडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

आंध्रप्रदेशातील पोचमपाड धरणाची निर्मिती झाली त्यावेळी महाराष्ट्र व आंध्र प्रदेश सरकारने या धरणातील बॅकवॉटर लक्षात घेऊन मराठवाड्याच्या हद्दीत पाच पूल बांधण्याचा करार करुन घेतला होता. ज्यामध्ये गोदावरी नदीवर बाभळी सिरसखोड, तर मांजरा नदीवर कंदाकुर्ती, नागणी व येसगी ठिकाणांचा समावेश होता. दरम्यानच्या काळात या पुलांची निर्मिती झाली. १९८३ मध्ये पुलाचे बांधकाम सुरु होते. यावेळी आलेल्या महापुरामुळे नागणी या ठिकाणचे पूल वाहूनही गेले होते. येसगीच्या अर्धवट पुलावरुन पाणी गेल्यामुळे भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन या पूलाची उंची वाढविण्यात आली. 

नांदेड जिल्ह्यातील मराठवाडा- तेलंगणा सीमेवर बिलोली तालुक्यात येसगी येथे उभारण्यात आलेल्या पूलाचा १९८६ मध्ये लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, आंध्रप्रदेशातील मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांच्या उपस्थितीत पार पडले. मराठवाड्यातून तेलंगणाकडे जाण्यासाठी हा पूल महत्त्वाचा ठरतो. अवघ्या पस्तीस वर्षांमध्येच हा पूल दोन वेळेला दुरुस्तीसाठी घेण्यात आला. बिलोली तालुक्यातून गेलेल्या राज्य मार्गाचा हा एक भाग होता. मात्र आता केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार राष्ट्रीय महामार्ग ६३ चा भाग म्हणून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी डबघाईला आलेल्या या पुलाची अवस्था लक्षात घेऊन नवीन पूल उभारणीसाठी १८८ कोटी ६९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे येसगी याठिकाणी आता नवीन पूलल उभारल्या जाणार आहे.

केंद्र शासनाच्या वतीने दळणवळणासाठी रस्ते विकास मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून केंद्रीय मंत्री श्री गडकरी यांनी नांदेड जिल्ह्यातील या महत्त्वाच्या पुलासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे भविष्यात या भागातील महत्त्वाचा प्रश्न सुटणार आहे.

पस्तीस वर्षातच पुलाची दुरवस्था.

राज्यांमधील बहुसंख्य ठिकाणी बांधण्यात आलेल्या मुलांचे आयुष्य दीडशे ते दोनशे वर्षापर्यंतचे होते. मात्र मराठवाडा तेलंगणा सीमेलगत उभारण्यात आलेल्या मांजरा नदीपात्रातील येसगी येथील पुलाची उभारणी होऊन पस्तीस वर्षांचा काळ पूर्ण होत आला आहे. या नदीपात्रातील अवैध रेती उपशाच्या ओव्हरलोड गाड्या गेल्यामुळे हे पूल लवकरच कोलमडण्याची भीती निर्माण झाली होती. ओव्हरलोड रेती तस्करी मुळेच पूलाचे आयुष्य कमी झाल्याचे जाणकारांचे मत आहे.

आंध्रप्रदेशातील पोचमपाड धरण बांधताना झालेल्या करारानुसार मराठवाड्याच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या बाभळी, सिरसखोड, कंदाकुर्ती, नांगरणी व येसगी या पाचही पुलांसाठीचा निधी तेलंगणा सरकारने खर्च केला होता. १९८३ मध्ये आलेल्या महापुरामुळे नागणीचे पूल वाहून गेले होते. त्याचा खर्च मात्र नंतर महाराष्ट्र शासनाने केल्याची माहिती आहे. आता मात्र या पुलाचा खर्च केंद्र शासनाच्या मार्फत होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.