Video - पालकमंत्री अशोक चव्हाण उपचारासाठी मुंबईला रवाना...

Nanded News
Nanded News
Updated on

नांदेड - सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे पुढील उपचारासाठी सोमवारी (ता. २५) सकाळी अकरा वाजता मुंबईला कार्डियाक अम्ब्युलन्समधून रवाना झाले. दरम्यान, कॉँग्रेसचे महानगराध्यक्ष आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘साहेब, लवकर बरे व्हा...’ अशा शुभेच्छा दिल्या. 

पालकमंत्री अशोक चव्हाण मुंबईहून नांदेडला दोन दिवसापूर्वी आले होते. दरम्यान रविवारी (ता. २४) त्यांना कोरोनाचा संशय आल्याने त्यांनी तत्काळ आरोग्य यंत्रणेला सांगून स्वॅब तपासणीसाठी दिला. रविवारी रात्री नऊ वाजता आलेल्या अहवालात दोन स्वॅब व्यक्तींचे स्वॅब पॉझिटिव्ह आल्याचे कळाले. त्यामध्ये एक ६१ वर्षीय शिवाजीनगर आणि एक चाळीस वर्षीय विवेकनगर येथील व्यक्तीचा असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी अहवालात दिली. 

कोरोना पॉझिटिव्हची चर्चा
सदरील माहिती रविवारी रात्री नऊ वाजता कळाल्यानंतर त्याची चर्चा सुरु झाली. कोरोनाची बाधा झाल्याचे बातमी विविध वेब माध्यमांसह सोशल मीडियावरही पसरले. त्यानंतर जिल्हा प्रशासन किंवा पालकमंत्री यांच्याकडून व इतर अधिकृत सूत्रांकडून अद्यापपर्यंत कोणताही दुजोरा दिला गेला नाही. परंतु काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह विरोधकांनी देखील ‘साहेब लवकर बरे व्हा..' चे संदेश फेसबुक, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोशल मीडियातून ही माहिती सर्वत्र गेल्यामुळे या वृत्ताला काँग्रेससह विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळत असल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर कॉँग्रेसचे काही पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी देखील हा संदेश पुढे शेअर करण्यास सुरुवात केली. 

खासगी रुग्णालयात दाखल
दरम्यान, पावडेवाडी नाका येथील एका खासगी रुग्णालयात श्री. चव्हाण यांना दाखल केल्याची माहिती मिळाली. रात्री तसेच सकाळी देखील कॉँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. आमदार अमर राजूरकर यांच्यासह इतर पदाधिकारीही उपस्थित होते. सकाळी दहा वाजता पोलिस यंत्रणा तसेच कार्डियाक रुग्णवाहिका आली. त्यानंतर तपासणी करुन अकराच्या सुमारास पालकमंत्री अशोक चव्हाण हे रुग्णालयातून बाहेर चालत आले. त्यांनी आमदार अमर राजूरकर व इतरांशी लांबूनच चर्चा केली. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला उपस्थित असलेल्या नागरिकांना तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हात करत आत बसले. त्यानंतर रुग्णवाहिका आणि पोलिसांचा ताफा रवाना झाला. 

नांदेड, मुंबई या ठिकाणी झाला दौरा
नांदेडचे पालकमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत राहिले. प्रशासनासोबत बैठका घेतल्या तसेच जिल्ह्यात फिरुन आढावा घेतला. अन्नधान्याचा किट वाटप केल्या. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधान परिषद निवडणूकीसाठी ते तातडीने विमानाने मुंबईला गेले. तेथील सर्वपक्षीय चर्चेत सहभागी झाले तसेच निवडणूकही बिनविरोध झाली. आठवडाभर मुंबईत थांबलेल्या श्री. चव्हाण यांनी मुंबई आणि मंत्रालयातील काही महत्त्वाच्या बैठकीला व मुख्यमंत्र्यांच्या विधानपरिषद सदस्यत्व शपथ कार्यक्रमास हजर राहिले. त्यानंतर तीन दिवसापूर्वी ते नांदेडला परत आले होते.

अहवाल आल्यानंतर चर्चा   
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी रविवारी रात्री नऊ वाजता अहवाल दिला. त्यात शिवाजीनगर भागातील ६१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आणि एक रूग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे सदरील व्यक्ती कोण अशी चर्चा सुरु झाली आणि ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली. व्यक्तीचे राहण्याचे ठिकाण, परिसर, वय तसेच खासगी रुग्णालय असे संदर्भ घेत अंदाज व्यक्त होण्यास सुरुवात झाली. एकमेकांना फोन सुरु झाले. टीव्हीवर तसेच व्हॉटसॲप आणि फेसबुक आदीच्या माध्यमातून नाव आल्याने अनेकजण एकमेकांना विचारणा करत होते. समर्थक आणि विरोधक एकमेकांना फोन करून खात्री करू लागले. तसेच काँग्रेसचे काही नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनी देखील व्हॉट्सॲप, फेसबुक व इतर सोशल मीडियावर ‘साहेब, लवकर बरे व्हा..' असे संदेश पाठवले. ही माहिती कळताच विरोधकांनीही देखील आपल्या सदिच्छा दिल्या. 

साहेब...आपण लवकर बरे व्हा...
कोरोनाविरूद्ध जीव धोक्यात घालून मैदानात उतरलेला योद्धा कोरोनाला हरवून परत येईल. या कठीण काळात आपण नांदेडची काळजी कुटुंब प्रमुख म्हणून घेत होता. जनतेचे आशीर्वाद, शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. माझा देव हार माननारा नाही. तमाम गोरगरिब, शेतकरी, कष्टकऱ्यांचे आशीर्वाद व आशीर्वादाची मोठी पुण्याई साहेबांच्या पाठीशी आहे. साहेब लवकरच बरे होऊन येतील.
- कॉँग्रेसचे नगरसेवक दुष्यंत सोनाळे यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.