तामसा ( जिल्हा नांदेड ) : आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या लिंगापुर (ता. हदगाव) येथे एकाच दिवशी २८ कोरोना बाधित निष्पन्न झाल्याने गावात खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा हादरली आहे. छोट्या गावात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लिंगापुर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील अंदाजे शंभर ग्रामस्थांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात आली होती. ता. सहा एप्रिलपर्यंत २९ ग्रामस्थ बाधित असल्याचा रिपोर्ट आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राप्त झाला. यामुळे आरोग्य केंद्रातील यंत्रणा खडबडून जागे होऊन ग्रामपंचायत व महसूल विभागाला याबाबत सूचना करण्यात आली. इतक्या मोठ्या संख्येने एकाच गावात बाधित असल्यामुळे संबंधितांना विलगीकरण कक्षात नेऊन गावात खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपायोजना आखण्याचे आवाहन संबंधित शासन विभागासमोर होते. गावात कोरोना संसर्गाचा विस्फोट होण्याची कारणे स्पष्ट होत नाहीत. स्थानिक ग्रामपंचायत व लींगापुर येथील आरोग्य उपकेंद्राद्वारे नागरिकांमध्ये कोरोना संदर्भाने आवश्यक ती जनजागृती झाली नसल्याचा परिणाम म्हणून या घटनेकडे बघितले जात आहे.
चार बाधियांच्या संपर्कातील गावातील इतरांची कोरोना तपासणी झाली
या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गावातील एका वृद्ध नागरिकाला दुचाकीवरुन दोघांनी आष्टी येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले होते. वृद्धाची कोरोना तपासणी पॉझिटीव्ह आल्यानंतर उर्वरित दोघेही तपासणीत पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. याच दरम्यान दवाखान्यात सलाईन लावलेल्या लिंगापुरच्या रुग्णाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता. या चार बाधियांच्या संपर्कातील गावातील इतरांची कोरोना तपासणी झाली, अशी माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश झुंबड यांनी सांगितले. पण गावातील विविध निमित्ताने झालेल्या गर्दीचा हा परिणाम असल्याची कुजबूज व्यक्त होत आहे. गावात बुधवारी (ता. सात) वैद्यकीय पथक पाचारण होऊन बाधितांना कोविड सेंटरच्या विलगीकरण कक्षात हलविण्यात येत होते. पण ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाकडून उपाययोजनांबाबत आवश्यक ती पावले उचलण्यात येत नसल्याची नाराजी अनेकांकडून व्यक्त होत आहे.
बाधितांनी विलगीकरण कक्षात दाखल व्हावे
विविध शासकीय विभागात कर्मचाऱ्यामधील समन्वयाचा अभाव या निमित्ताने उघड झाला असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाय योजना योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, बाधितांनी विलगीकरण कक्षात दाखल व्हावे, संपर्कातील उर्वरित ग्रामस्थांनी कोरोना तपासणी करावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कदम यांनी केले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने या घटनेची दखल घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.