नांदेड : पावसाळा सुरू झाला की विविध प्रकारच्या रानभाज्या बाजारात दाखल होतात. रानभाज्या आरोग्यासाठी गुणकारी असल्यामुळे खाद्यप्रेमींत रानभाज्यांचे आकर्षण आहे. सध्या बाजारात अंबाडी, कर्टुले, करवंद, तरोटा आदी रानभाज्यांची रेलचेल दिसून येत आहे. नेहमीच्या भाज्यांच्या तुलनेत या भाज्यांचे दर अधिक आहेत. शहरासह ग्रामीण भागातील आठवडे बाजारात या भाज्या विक्रीसाठी आल्या आहेत.
दरवर्षी पावसाळा आला की आपल्या जवळपास शहरानजीकच्या रानमाळावर हिरवळ पसरते. यात अनेक रानभाज्यांचाही समावेश असतो. विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना या भाज्यांची चांगली ओळख असते. एवढेच नव्हे तर या भाज्यांचे औषधी गुणधर्म माहीत असल्याने ते त्या भाज्या सेवन करतात. रानभाज्यांमध्ये टाकळा ही वनस्पती पावसाळ्यात उगवून ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तिला फुले येतात.
तर, तरोटा ही वनस्पती पावसाळा लागला की लगेच उगवते. ती कोवळी असताना त्याची भाजी चवदार व रुचकर लागते. त्यानंतर ती जरठ होते. माहूर, किनवटमधील डोंगराळ, दुर्गम, वनस्पतीव गाव खेड्यातील आदिवासी बांधव त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील या रानभाज्यांचा आपल्या जेवणात वापर करतात. जसे ऋतू बदलतात त्यानुसार या भाज्या सहज उपलब्ध होतात.
शहरातील वजिराबाद, तरोडा नाका येथे रोज तर आठवडे बाजारात विक्रीसाठी रानभाज्या उपलब्ध आहेत. नव्या पिढीला जुन्या पिढीतील भाज्यांचे हे ज्ञान कायम आहे. या रानभाज्या त्यांच्या दैनंदिन अन्नातील अविभाज्य घटक बनल्या आहेत.
पावसाळा सुरू झाल्याने बाजारात रानभाज्या दिसत आहे. ४० ते ६० रुपये पावपर्यंत भाज्यांचे दर आहेत. नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या या रानभाज्या चवीला रुचकर असतात. त्यामध्ये पौष्टिक आणि त्यात औषधी गुणधर्म असतात, असे तज्ज्ञांमधून सांगण्यात येते.
रानभाज्या एक ते दोन महिने उपलब्ध राहतात. उपलब्धतेनुसार या भाज्यांचा आस्वाद घेता येतो. कर्टुले, चिवळ, आघाडा, हडसन, शेपू, पाथरी, अंबाडी, केना, करवंद, चमकुराची पाने, फांदीची भाजी, तरोटा, आंबट चुका, वाघाटे, तांदुळजा, सुरण कंद, बारकी घोळ आदी भाज्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात रानभाज्या बाजारात दाखल होतात. वात, पित्त तसेच आरोग्यासाठी लाभदायक आहे. आयुर्वेदिक, औषधी गुणधर्म या रानभाज्यात असतात. नागरिकांनी त्याचे सेवन करावे.
-मोहम्मद जावेद बागवान, विक्रेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.