Nanded News : भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात सोमवारी व मंगळवारी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार जिल्ह्यात रविवारपासून पाऊस होत आहे. सोमवारी (ता. १५) मात्र पावसाचा जोर वाढला. रात्री ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.
बिलोली, धर्माबाद, किनवट, उमरी नायगाव या तेलंगणा सीमावर्ती भागातील तालुक्यांत सर्वाधिक झाला. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने बिलोली तालुक्यात सरासरी ७७.३० व धर्माबादमध्ये सरासरी ८१.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने या तालुक्यांसह १४ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
यासोबतच इतरही अनेक मंडळांत ५० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या ओढ्यांना पाणी आले आहे. तसेच, खरिपातील कपाशी व सोयाबीन पिकांनाही उभारी मिळाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी (ता.१६) सकाळी साडेआठपर्यंत सरासरी ३७.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी पाऊस सुरूच होता.
राज्यपाल दत्तक गाव जवरला ते मांडवी रस्त्यावरील पुलाच्या दरवाजात मोठी लाकडे व कचरा अडकला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी झालेल्या दमदार पावसामुळे पुलावरून पाणी वाहिले. यामुळे जवरला गावाचा दिवसभर संपर्क तुटलेला होता.
परिसरातील अनेक गावच्या नागरिकांना मांडवी ते किनवट या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. यावर नेहमीच वर्दळ असते. पावसाच्या पहिल्या पुरात नाल्यावरील पुलाला मोठी लाकडे व काडी कचरा अडकल्यामुळे पुलाचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे गावकऱ्यांचा संपर्क तुटतो.
याबाबत ‘सकाळ’ने ११ जुलैच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते, परंतु कुंभकर्णी झोपेत असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची श्यक्यता वर्तविली जात आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास पुलाच्या दोन्ही बाजूंकडील रस्ता वाहून जाणार आहे. तसेच, परिसरातील नागरिकांचा तालुक्याशी असलेला संपर्कही तुटू शकतो.
मंगळवारी संध्याकाळी व रात्री दमदार पाऊस झाला. यामुले नरसी परिसरातील कांडाळा, धानोरा, होटाळा, हिप्परगामाळ, कुंचेलीसह परिसरातील शेतकरी गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कांडाळा, मुगाव मरवाळी, मरवाळी तांडा, बेंद्री खंडगाव, पिंपळ गाव, खैरगाव, बेटकबिलोलीसह सर्वत्र पाऊस झाला.
मृग नक्षात्रानंतर पहिल्यांदाच एवढा मोठा पाऊस झाला. या पावसामुळे नायगाव शहर, नरसी फाटा परिसरातील गावे जलमय झाली होती. तसेच नदी, नाले ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे. नाल्या तुंबलेल्या असल्याने शहरात पाणीच पाणी झाले.
तालुक्यात सोमवारी संध्याकाळी ते मंगळवारी (ता.१६) पहाटे आठ वाजेपर्यंत तब्बल ७० मिलिमीटर पाऊस झाला. तालुक्यात अतिवृष्टी झाली असून नुकसानीची अद्याप पर्यंत माहिती महसूल विभागाकडे आली नसल्याचे तहसीलदार किशोर यादव यांनी सांगितले .
तालुक्यात जूनमध्ये साधारण तर जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडत असतो, पण गेल्या दीड महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांत काळजीचे वातावरण होते. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळल्याने तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यात अधूनमधून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. तालुक्यात सर्व दूर मुसळधार पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.