नांदेड : तरोडा भागातील प्रेमनगर सोसायीच्या अनधिकृत बांधकाम व बनावट बिगरशेती परवान्याचे प्रकरण उच्च न्यायालयात पोहचले आहे. या इमारतीत सदनिका घेतल्याने फसवणुकीस बळी पडलेल्या एका व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली असून, न्यायालयाने या प्रकरणात महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी, महानगरपालिका प्रशासन आणि बिल्डरला नोटीस बजावली आहे.
नांदेड शहरातील तरोडा खु. येथील गट नंबर १३७ मध्ये प्रेमनगर फेस-एक व फेस-दोन या नावाने आर के कन्स्ट्रक्शनचे भागिदार रेणापुरकर यांनी सुमारे १४१ सदनिका उभ्या केल्या. या सदनिकेच्या नकाशात खरेदीदारांना दर्शवलेल्या पार्किंग व मोकळ्या जागेत सदनिका व दुकान गाळे काढून त्याची बेकायदेशीर विक्री केली आहे. २०१२ मध्ये महापालिकेने या बांधकामाचा पंचनामा करून बिल्डरला कारणे दाखवा नोटीसही दिली होती. परंतु, पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
याचिकाकर्ते सतीश त्र्यंबकराव व्यवहारे यांनी २०१७ मध्ये आर के बिल्डर यांच्याकडून प्रेमनगर अपार्टमेंटमधील एक सदनिका विकत घेतली. त्यानंतर त्यांना या बेकायदेशीर बांधकामाबद्दल समजल्यामुळे आणि पार्किंगच्या जागेत बांधकाम सुरु असल्याने बिल्डरला जाब विचारला. तेव्हा त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली. दरम्यान श्री. व्यवहारे यांनी महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करूनही या बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडेही बिल्डर विरोधात फसवणुकीची तक्रार केली. परंतु, तेथेही कोणीच दखल घेतली नाही.
महापालिका प्रशासनाने आॅगस्ट २०२० मध्ये पुन्हा एकदा बिल्डरला बेकायदेशीर बांधकामाबाबत केवळ कारणे दाखवा नोटीस दिली. परंतु, पुढील कारवाई मात्र केली नाही. त्यामुळे व्यथीत होऊन याचिकाकर्ते व्यवहारे यांनी अॅड. डॉ. स्वप्नील तावशीकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर सात जानेवारी रोजी प्राथमिक सुनावणी झाली. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व एस. डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने संबंधित बिल्डरला प्रतिवादी म्हणून सहभागी करण्याचे आणि बिल्डरसह महापालिका प्रशासन तसेच शासनास नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. शासनातर्फे अॅड. ए. आर. काळे यानी बाजू मांडली.
तरोडा खुर्द येथील गट नं. 137 मध्ये प्रेमनगर अपार्टमेंट सदनिका बांधल्या आहेत. या सदनिका बांधत असताना रितसर मंजुरी तसेच मंजुर नकाशानुसारच बांधकाम केलेले आहे. परंतु, वैयक्तिक आकसापोटी आर के कन्स्ट्रक्शनला तसेच बिल्डरला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे, असे मला वाटते.
- बलभिम रेणापूरकर, आर के कन्स्ट्रक्शन नांदेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.