सर्वाधिक प्राधान्य जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी - पालकमंत्री अशोक चव्हाण

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण
Updated on

नांदेड - जिल्ह्यातील विविध विकासकामांमध्ये आता अधिक प्राधान्य हे स्वाभाविकच आरोग्याला देणे अत्यावश्यक झाले आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजनेत सर्वाधिक प्राधान्य हे आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यावर असल्याचे सुतोवाच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी (ता. सहा जून) केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात जिल्हा वार्षिक योजना २०१९- २०२० ची आढावा बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे सभापती ॲड. रामराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. अभिनव गोयल, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील आदी उपस्थित होते.

शासकीय आरोग्य सुविधांवर भर
येत्या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेंतर्गत १०३.९५ कोटी रुपयांची सुधारीत तरतूद असून यात जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकटीकरण, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ४१.५४ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत पाच कोटी २८ लक्ष ६६ हजार रुपये एवढा निधी किनवट आणि माहूर तालुक्यातील आदिवासी भागात आरोग्य सेवा बळकटी करणासाठी खर्च करण्यात येणार आहे. यातून जिल्ह्यातील जनतेला अधिकाधिक शासकिय आरोग्य सुविधा कशा उपलब्ध करुन देता येतील, यावर आमचा भर असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. नव्याने उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या आरोग्यविषयक सुविधा या अधिकाधिक चांगल्या गुणवत्तेच्या कशा निर्माण करता येतील, याचा ध्यास संबंधित विभाग प्रमुखांनी घेतला पाहिजे. शासकिय निधीतून होणाऱ्या या कामांच्या गुणवत्तेत कोणतीही त्रुटी राहता कामा नये याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.   

शासकीय रुग्णालयात स्वच्छता हवी
जिल्ह्यातील विविध तालुक्यात चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले. आजच्या घडीला ज्या काही वैद्यकिय सेवा - सुविधा उपलब्ध आहेत त्यात स्वच्छतेचा भाग खूप महत्वपूर्ण आहे. नागरिकांच्या बहुसंख्य तक्रारी या शासकीय दवाखान्यातील स्वच्छतेशी निगडित आहेत. कोणत्याही रुग्णाला दवाखान्यातील वातावरण अधिक परिणाम करणारे असते, हे लक्षात घेऊन दवाखान्यातील स्वच्छता आणि वार्डाची रचना ही अधिकाधिक कशी चांगली होईल यावर संबंधित विभागप्रमुखांनी अधिक लक्ष दिले पाहिजे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी केल्या.

कचरा व्यवस्थापनाकडे तत्काळ लक्ष द्या
डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील कचरा व्यवस्थापन आणि तेथील घाण पाण्याचा प्रश्न अधिक आव्हानात्मक आहे. याबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. येथील अस्वच्छतेच्या अनेक तक्रारी येत असून याची योग्य खबरदारी घेण्याचे निर्देश अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले. महापालिका व वैद्यकिय महाविद्यालय यांनी एकत्र बसून येथील अस्वच्छ पाणी व्यवस्थापन व इतर बाबीबाबत त्वरीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आयुष अंतर्गत उपाययोजना महत्वाच्या 
आयुष अंतर्गत विविध उपाययोजना महत्वाच्या आहेत. नांदेड येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची उपलब्धी लक्षात घेता आयुर्वेदाच्या दृष्टीनेही जन आरोग्य सुविधेवर लक्ष केंद्रीत केले आहे. आयुर्वेदिक महाविद्यालयाची इमारत व इतर सुविधांची स्थिती पाहता यात लवकरच कायापालट करू, असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सूचित केले. बारड येथे आयुर्वेदिक महाविद्यालयाअंतर्गत असलेल्या शंभर एकर जमिनीवर आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची अधिक चांगल्या प्रकारे लागवड करण्यासाठी कृषि विभागातील एका अधिकाऱ्याकडे याचे नियोजन सुपूर्द करण्याबाबतचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिले.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.