किनवट ( नांदेड) : अम्मा ! खासदार हेमंतभाऊ पाटील उन्नडा. राधाबाई रामलू कोत्तुरवार एकदमच उद्गारल्या. सर्व महिला अवाक् झाल्या. गोकुंद्यात राजर्षी शाहू नगरातील महिला कोजागिरी पौर्णिमा साजरी करतांना कोणतीही पूर्वकल्पना नसतांना अचानक खासदार आले. बाजूलाच गुंडाळून ठेवलेली चटई स्वतः अंथरली आणि त्यावर बसले. अन् पात्र समोर घेऊन म्हणाले, काय काय शिजवताय? वाढा आम्हाला.
दरम्यान हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील अचानक आल्यामुळे सर्व महिला अचंबित झाल्या. खासदार माणूस स्वतः येतात. ना थाट, ना बाट. सर्व सामान्यात मिसळतात. जे असेल ते स्वतः आग्रहानं मागून खातात. सर्वांची ख्याली खुशाली विचारतात. एकोप्यानं उत्सव साजरा करणाऱ्या महिला मंडाळांचं कौतुक करतात. त्यांना शुभेच्छा देतात. हे सगळं पाहून महिला मंडळच नाहीतर गावातील सर्वच ग्रामस्थांना आश्चर्याचाच धक्का बसला.
कोजागिरीनिमित्त राजर्षीशाहूनगरमधील महिला एकत्र आल्या. एका चुलीवर मोठ्या पातेल्यात दूध तापायला ठेवलं होतं. काही महिलांनी खिचडी तयार करून गप्पा मारत बसल्या होत्या, तर काही महिला भजे तळत होत्या. रात्री ९.२७ ची वेळ असेल, अचानक खासदार हेमंत पाटील यांची गाडी येवून कार्यक्रमस्थळी पोचली. गाडीतून उतरल्यानंतर खासदार थेट महिलांच्या कार्यक्रमस्थळी आले. त्यांनी स्वतः तिथे असलेली छोटी चटई उचलून अंथरली. मग आपसूकच सर्व कार्यकर्ते आजूबाजूला बसले. त्यांनी महिलांना विचारलं, काय बनवत आहात? गरमागरम खिचडी भजे आम्हाला द्या.
महिलांनीही त्यांचा पाहुणचार अगदी आनंदाने केला. खिचडी, भजे व मसाला दुध दिले. या सर्वांवत ताव मारत असतानाच महिलांमध्ये समरस होऊन त्यांनी सुख-दुःखाची विचारपूस केली. हे सगळं पाहून सर्वसामान्य माणसांमध्ये वावरणाऱ्या खासदारांच्या कृतीला सर्व महिलांनी सलाम ठोकला. कारण आजपर्यंत त्यांनी असं कधी अनुभवलं नव्हतं. कोणता आमदार-खासदार अशा पद्धतीने कोणतीही पूर्वकल्पना न देता, कोणतेही निमंत्रण न देता अचानकपणे येतात आणि महिला घोळका काय करत आहे? त्यांच्याशी संवाद साधतात असे कधीच झाले नाही.
यंदाच्या कोजागिरीला वेगळाच आनंद मिळाला
राजर्षी शाहू नगरातील राधाबाई रामलु कोत्तरवार, प्रियाताई राजू कुमरे, अंजलीताई कपिल रेड्डी, पद्मीनाताई मुसळे, उज्वला गणपत मडावी, प्रभा सुदर्शन मेश्राम, ललिता मुसने, अनुताई खिसले, मेघा कोत्तुवार, सपना बटूर, रमा परमेश्वर गायकवाड या महिलांनी यावर्षीची कोजागिरी पौर्णिमा अचानक आलेल्या खासदार हेमंत पाटील यांच्यासोबत साजरी करून एक वेगळा आनंद आम्हा महिला मंडळास मिळाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
संपादन - सुस्मिता वडतिले
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.