देगलूर : होट्टल महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी स्थानिक कलाकारांसह औरंगाबाद, पुणे येथील कलाकारांच्या अदाकारीने श्रोत्यांना सांस्कृतिक मेजवानी मिळाली. श्रोते अगदी तल्लीन होत मंत्रमुग्ध झाले, तर शेवटच्या सत्रातील मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाने रविवारच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
मुळचे बिलोली येथील रहिवाशी असलेले दिलीप खंडेराय यांच्या खंडेराय प्रतिष्ठान औरंगाबाद या संचातील कलाकारांनी गणगवळण, गोंधळाचा, कार्यक्रम सादर करत दर्शकांची वाहवा मिळवली. ग्रामिण भागातील वाजंत्रीच्या लोक नृत्यावर रसिकांनीही ताल धरली. जिल्ह्यातील श्रुती पोरवाल हिच्या कथ्थक नृत्याने ग्रामीण रसिकांना शास्त्रीय नाट्य कलेतील विविध छटा या नृत्यातून पाहायला मिळाल्या. प्रख्यात बासरीवादक देगलूरचे रहिवासी ऐनोद्दीन वारसी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या होट्टल जिल्हा परिषद शाळेतील मुला मुलींचा वेणूवृंद संचाने उत्कृष्ट बासरी वादन केले. त्यांनी आपल्या सादरीकरणातून देशभक्तीपर गीते, आरती, भारुडेही वाजवुन प्रेक्षकांची दाद मिळवली.
दुसऱ्या सत्रात गुंजन पंकज शिरभाते या मुलीने उत्कृष्ट वायोलिन वादनातून आपली कला प्रेक्षकांसमोर सादर केली. अंध विद्यालय बोधडी येथील शिक्षक राजेश ठाकरे यांनी शास्त्रीय गायनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात पत्रकार विजय जोशी निर्मित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाने रंगत आणली. या वेळी सादर करण्यात आलेल्या लावणी, भारुडे, भक्ती गीते, गोंधळाचा कार्यक्रमात, प्रेक्षकांसह प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही ठेका धरण्यास प्रवृत्त केले. या कार्यक्रमातील उपस्थित कलाकारांचे आमदार जितेश अंतापूरकर, माजी उपनगराध्यक्ष बालाजीराव रोयलावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी माजी आमदार गंगाधरराव पटणे, पर्यटन खात्याचे संचालक डॉ. श्रीकांत हरकर, सहायक जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, श्रीमती शितल अंतापूरकर, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदा देशमुख, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयाळे, शक्ती कदम, तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार वसंत नरवाडे, रामराव पंगे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.