नांदेड - शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरी, घरफोडी व इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याला रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील गुन्हेगारांना अटक करण्यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या सूचनेनुसार पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, रामतीर्थ पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अजरोद्दीन रहिमोद्दीन शेख हा नांदेड शहरातील खडकपुरा भागात आल्याची माहिती सोमवारी (ता. दोन) सायंकाळी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खडकपुरा भागात पाण्याच्या टाकीजवळून त्याला अटक केली. त्याने व त्याचा साथीदार लतीफ शेख उर्फ नईम महेबुब (रा. गाडेगाव रस्ता, नांदेड) यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर आरोपीवर बरेच गंभीर गुन्हे दाखल असून त्यांना पुढील तपासकामी रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती श्री. चिखलीकर यांनी दिली. या कारवाईत फौजदार प्रविण राठोड, पोलिस जमादार गुंडेराव करले, पोलिस नायक अफजल पठाण, देविदास चव्हाण, रवी बाबर, विठ्ठल शेळके, बजरंग बोडके आणि हेमंत बिचकेवार यांनी सहभाग घेतला.
शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
नांदेड ः कलंबर खुर्द (ता. लोहा) येथील दिगंबर कोडिंबा काटेवाड (वय ३८) हे शेतकरी शेतातील नापिकीमुळे तसेच बॅंकेचे कर्ज कसे फेडावे आणि मुलीचे लग्न कसे करावे, या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. शनिवारी (ता. ३०) सकाळी आठच्या सुमारास त्यांनी विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी विष्णुपुरीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांचे भाऊ बळीराम काटेवाड यांनी दिलेल्या माहितीवरून उस्माननगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास फौजदार थोरे करत आहेत.
एकाला तलवारीने मारहाण
नांदेड ः हिंगोली उड्डाण पुलाखाली रुमान इरफान शेख (वय २३, रा. सराफा चौक) हा मेकॅनिक काम करत होता. त्यावेळी मंगळवारी (ता. तीन) दुपारी साडेबारा वाजता जुन्या पैशाच्या देवाण घेवाणीच्या कारणावरून आरोपितांनी संगनमत केले आणि त्यांना तलवारीने मारहाण केली. त्यात त्यांना डाव्या हातावर वार बसले. हाताचे करंगळीजवळील बोट तुटून गंभीर जखमी केले व खुनाचा प्रयत्न केला. याबाबत वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला फौजदार मुंडे करत आहेत.
महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरले
नांदेड ः वसंतनगर भागात मुक्तेश्वरनगर येथे सुनिता गणेश वडजे (वय ३३) या महिला घरासमोर सोमवारी (ता. दोन) दुपारी अडीच वाजता उभ्या होत्या. त्यावेळी दोन व्यक्ती दुचाकीवर आल्या आणि त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकाऊन घेतले आणि दुचाकीवरून पळून गेले. त्यांनी आरडाओरडा केला पण तो पर्यंत चोरटे पळून गेले होते. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार थोरवे करत आहेत.
हेही वाचलेच पाहिजे - गोकुंद्यातील महिला मंडळाच्या कोजागिरीला आले आनंदाचे उधान
गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या
नांदेड ः तरोडा खुर्द येथील सुजाता भारत ढोले (वय २१) या विवाहितेला तिच्या सासरची मंडळी शारिरिक व मानसिक त्रास देत होती. काम तसेच स्वयंपाक येत नाही, मूल होत नाही, घर बांधण्यासाठी वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणून तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत होती. शेवटी या छळाला कंटाळून तिने रविवारी (ता. एक) सायंकाळी नऊच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत संभाजी पोहरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळीविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भोसले करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.