नांदेडचे कुमठेकर सर म्हणजे पुस्तकं वाटणारा देवमाणूस !

file photo
file photo
Updated on

नांदेड : आमचे गुरुजी, नांदेडच्या सायन्स कॉलेजमधील इंग्रजीचे निवृत्त प्रा. डॉ. विलास किशनराव कुमठेकर यांचे काल (गुरुवार, ता. एक एप्रिल) सकाळी सहा वाजता नांदेड येथे कोरोनामुळे निधन झाले. मागील सहा दिवसांपासून ते विष्णुपुरीच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. येत्या १२ मे रोजी कुमठेकर सरांनी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असते. त्यांना कळू न देता, त्यांच्यावरील गौरवग्रंथ सिद्ध करण्याचे काम मार्गी लागले होते. तथापि हे नियतीला मान्यच नसावे, कदाचित! ही बातमी आमच्यासाठी अतिशय धक्कादायक आहे. सदैव इतरांचा गौरव करण्यात धन्यता मानणाऱ्या कुमठेकर सरांनी स्वतःचा मात्र कधीच गौरव करून घेतला नाही. 

कुमठेकर सर म्हणजे साक्षात विनम्रता! कुमठेकर सर म्हणजे साक्षात शिष्टाचार! 

मागील काही वर्षांपूर्वी डॉ. कुमठेकर सरांनी रक्ताच्या कर्करोगावर यशस्वी मात केली होती. म्हणून आम्ही सगळे त्यांना 'मृत्युंजय' समजत होतो, पण दुर्दैवाने ते कोविडच्या संसर्गावर मात करु शकले नाहीत. कोरोनाच्या वावटळीत कुमठेकर नावाचा पारिजात उन्मळून पडला. 

डॉ. कुमठेकर सरांनी आरंभीच्या काळात उमरीच्या यशवंत विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले होते. तेव्हा आम्हाला त्यांचा प्रेमळ सहवास लाभला. सेवानिवृत्तीनंतर काही दिवस त्यांनी विदर्भातील कारंजा लाड येथील महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. गप्प बसणे हा सरांचा स्वभावच नव्हता. 

कुमठेकर सर बुद्धाचे तत्त्वज्ञान जगत होते. अपरिग्रह वृत्ती त्यांच्या रोमारोमांत भिनली होती. लेखकाकडून पुस्तके घ्यायची आणि वाचकांपर्यंत पोहोचवायची, हा त्यांचा आवडता छंद होता. स्वखर्चाने ते इतर लेखक- प्रकाशकांची पुस्तके वितरित करत. अगदी पदराला खार लावून! अशी ग्रंथनिष्ठा हल्ली दुर्मीळ झाली आहे. 

डॉ. विलास कुमठेकर सर हे एक ज्येष्ठ साहित्यिक होते. त्यांनी शेकडो पुस्तकांविषयी अतिशय स्वागतशीलतेने परिचयात्मक लेखन केले आहे. विविध वृत्तपत्रांतून विपुल प्रासंगिक लेखन केले आहे. पुस्तक प्रकाशन समारंभ कोणाचाही असो, सर त्या पुस्तकाविषयी आत्मीयतेने लिहिणार. एखाद्या दैनिकात तो लेख छापून आणणार आणि प्रकाशन सोहळ्यात त्या दैनिकाचे अंक आपल्या खर्चाने स्वतः वितरित करणार. ही सगळी निष्काम सेवा. कोणाकडूनही कसलीच अपेक्षा नाही. कोणाला औपचारिक आभार मानण्याची संधीसुद्धा ते देत नसत. जगावर एकतर्फी प्रेम करत राहणे, ही सरांची उपजत वृत्ती!

सरांनी नांदेड आकाशवाणीवर अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या होत्या. नांदेडला एखादा मोठा माणूस आला, म्हणजे सर त्याची हमखास मुलाखत घेणारच, हा सरांचा अलिखित नियमच होता. 

शिष्टाचार शिकावेत, ते कुमठेकर सरांकडून! 'गॉड ब्लेस यू' हे डॉ. विलास कुमठेकर सरांच्या ओठांवरील आशीर्वचनपर परवलीचे शब्द होते. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व, सकारात्मक जीवनशैली आणि मनोभावे सर्वांचे कल्याण चिंतणे हा डॉ. कुमठेकर सरांच्या मृदू स्वभावाचा स्थायीभाव होता. शिष्टाचारांना मानवी देह धारण करावा, असे वाटले आणि शिष्टाचारांनी कुमठेकर सरांच्या रुपाने पृथ्वीवर जन्म घेतला, असे मला सारखे वाटायचे. माझ्या परिचयातील असा हा शेवटचा माणूस! अशी सदैव परोपकारासाठीच जगणारी माणसे शोधून सापडणार नाहीत. कुमठेकर सर असे एकमेवाद्वितीय होते. सरांची इच्छाशक्ती फारच प्रबळ होती. कुमठेकर सर म्हणजे अखंड आनंद वाटत फिरणारा फकीर होते. कोणत्याही लाभाविना प्रीती करणारे! 

आपण कर्करोगावर कशी मात केली, याविषयीचे त्यांचे अनुभवकथन आणि नांदेडच्या विद्यापीठाविषयी त्यांनी अलीकडेच लिहिलेले पुस्तक अप्रकाशित राहिले आहे. विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात सरांना ते पुस्तक प्रकाशित करायचे होते. कुलगुरुंशी त्यांनी तसे बोलून ठेवले होते, पण कोरोनामुळे असा काही समारंभ झालाच नाही... आणि सरांचे पुस्तक मागेच राहून गेले. महाराष्ट्रातील असंख्य साहित्यिक आणि संपादकांशी सरांचा नियमित संवाद होता. अनेक साहित्यिकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते स्वतः तर अभीष्टचिंतन करणारच, शिवाय मलाही फोन लावून देणार! सगळ्यांविषयी कमालीची सकारात्मकता! कोणाविषयीसुद्धा नकारात्मक विचार नाही! आमचे सर म्हणजे जगन्मित्रच होते. त्यांचे अंतःकरण विशाल होते, समुद्रासारखे, सगळ्यांना प्रेमाने सामावून घेणारे. समाजातील हजारो लोकांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे आणि घरोब्याचे संबंध होते. त्यांनी शिकविलेले हजारो विद्यार्थी आज मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. सर अखंड ऊर्जा आणि आत्मविश्वास पेरत राहिले. त्यांनी पेरलेले काहीच वाया गेले नाही. 

कुमठेकर सरांच्या पश्चात पत्नी निवृत्त प्राध्यापिका डॉ. ज्योती देशपांडे- कुमठेकर, तीन भाऊ, दोन बहिणी, मुलगा विक्रांत, मुलगी सौ. प्राजक्ता पांडे, सून, नातू, असा मोठा परिवार आहे. डॉ. कुमठेकर सरांच्या आकस्मिक निधनामुळे आमच्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांची मोठी हानी झाली आहे. केवळ चि. विक्रांत आणि चि. प्राजक्ताच पोरके झाले आहेत, असे नाही, तर आमच्यासारखे हजारो विद्यार्थी आज पोरकेपण अनुभवत आहेत. साठीतील आपल्या विद्यार्थ्यांना एकेरी नावाने संबोधणारे, असे मातृह्रदयी गुरुजी आज दुर्मीळ झाले आहेत. गुरुजींना श्रद्धांजली वाहण्याची हिंमतच होत नाही.

कुमठेकर सर हे आमचे गुरुजी होते. एम. एड्चे शिक्षण घेताना वर्गबंधू- वर्गमित्र होते. सदासर्वकाळ हितचिंतक, मार्गदर्शक आणि आप्तस्वकीय होते. 
गुरुजी, तुम्ही दीर्घकाळ आम्हाला हवे होतात, 'बदमाश' अशी प्रेमळ आणि हवीहवीशी शिवी देण्यासाठी! तुमची शिवीसुद्धा आम्हाला आत्मीय ओवी वाटायची हो!
प्रा. डाॅ. सुरेश सावंत यांच्या फेसबुक पेजवरुन साभार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.