जगणे यापुढेही नव्याने उगवत राहिल- मनोज बोरगावकर

एखादी गोष्ट पुन्हा नव्याने शिकायला मिळणे यासारखा मोठा आनंद कशात नाही. श्वासाला जपत जगणे हे तसे पहिले तर नव्याने उगवण्या सारखेच आहे हे आपण समजून घेतले पाहिजे या शब्दात “नदिष्ट”कार मनोज बोरगावकर यांनी आपले अनुभव विश्व उलगडून दाखविले.
मनोज बोरगावकर
मनोज बोरगावकर
Updated on

नांदेड : कधी काळी हजारो वर्षांपूर्वी अजस्त्र अशा डायनासोरचा वावर या पृथ्वीतलावर होता तेंव्हा अवघी पाच ते सहा फुट उंची असलेला माणूस या जगावर राज्य करील याचा विश्वास कोणालाच नसेल ! प्रगतीचे सारी शिखरे पादाक्रांत केल्यावर मानव जात एका साध्या व्हायरसमुळे ठप्प होते हेच मुळात नव्याने जन्म घ्यायला लावण्यासारखे, पहिल्या श्वासापासून पुन्हा शिकण्यासारखेच आहे.

एखादी गोष्ट पुन्हा नव्याने शिकायला मिळणे यासारखा मोठा आनंद कशात नाही. श्वासाला जपत जगणे हे तसे पहिले तर नव्याने उगवण्या सारखेच आहे हे आपण समजून घेतले पाहिजे या शब्दात “नदिष्ट”कार मनोज बोरगावकर यांनी आपले अनुभव विश्व उलगडून दाखविले. नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सकारात्मकता वाढावी या उद्देशाने सुरु केलेल्या मिशन पॉझिटिव्ह सोच अभियानाला आपली सकारात्मकतेचा शिदोरी त्यांनी दिली. कोरोनाच्या या काळात आपल्या मानसिक तोलाला सावरणाऱ्या अनेक महत्त्वपूर्णबाबी त्यांनी उलगडून दाखविल्या.

हेही वाचा - अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त वृक्षारोपण; का करावे वृक्ष लागवड? वाचा सविस्तर

प्रगतीच्या नावाखाली आपण केंव्हा स्वत:ला, निसर्गाला, चराचराला पारखे झालो हे कोणाच्या लक्षातही आले नाही. निसर्गाला काही परतही करावे लागते ही मूळ शिकावं आपण विसरून गेलो. आपल्या जगण्यावर भौतिक सुखाचे, मोहाचे चढलेले हे अनावश्यक पुट, थर लागत गेल्याने हा निगरगट्टपणा आला असेल ? कोरोना नावाच्या एका आजाराने ही सारी थरे आता गळून पडायला लागली आहेत. या 14 महिन्यात जे काही घडले ते आजवरच्या इतिहासात घडले नाही. कदाचित भविष्यातही इतक्या कमी कालावधीत घडेल हे सांगता येत नाही. गरीब-श्रीमंत, जात-पात, लहान-मोठा अशी सारी काही अंतरे आपण मिटवू शकलो नाही ते बदल या अवघ्या 14 महिन्यात घडले. एका-एका श्वासाची किंमत मानवाच्या लक्षात आली. एरवी प्रत्येक व्यक्ती जेंव्हा जन्म घेतो तेंव्हा त्याची नाळ कापल्या शिवाय त्याचा श्वास सुरु होत नाही. श्वासाचे हे तंतर नाळीपासून सुरू होते. नाळीशी असलेली आपली बांधिलकी आपण विसरुन गेलो आहोत. त्याला भानावर आणणारा हा काळ आहे.

हा काळ गरजूसाठी एकहोऊन मदत करणारा, भूकेल्याच्या ताटात अन्न पोहोचावे यासाठी जसे जमेल तसे काही तरी करायला लावणारा काळ आहे. या काळाने खूप काही समज आणि उमज माणसाला दिली. प्रत्येक काळ हा इतिहासाचा संदर्भ असतो. सामान्य माणूस हा इतिहासाचा केवळ साक्षिदार नसतो तर तो इतिहास घडवू शकतो याचे पून: प्रत्यंतर देणारा हा काळ आहे. कोणीही कोणासाठी काहीही करण्यासाठी परावृत्त करणारा हा काळ आहे. अगदी आपल्या घरातील परिवारातला सदस्य नसला तरीही कुणावर वेळ आलीच तर त्याला अग्नी डाग देऊन आपलेपणाने दोन आसवे ओघळविणारा हा काळ आहे. याला वाईट कसे म्हणावे ?

येथे क्लिक करा - “पोषण पुनर्वसन केंद्र” सुरु करुन कुपोषणावर मात करावी- डॉ. बेलखोडे

प्रत्येक काळ हा जगण्याचे नवे संदर्भ देण्यासाठी, शिकविण्यासाठी अतूर असतो. प्रत्यक्ष जगल्याशिवाय, अनुभवल्याशिवाय संदर्भ निर्माण होत नाहीत. संदर्भहिन जगणे आणि संदर्भासहित जगणे यात नेमका कसा फरक असतो तो शिकविणारा हा काळ आहे, हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. नितळ जगणेही असते, नितळ फक्त पाणी नसते, मन नसते याचा धडा देणारा, जगण्यातील नितळपणा आणणारा हा काळ आहे. हे सूत्र समजून प्रत्येक व्यक्तीने आली ती आव्हाने पेलत, सोसत एकमेकाला धीर देत, काळजी घेत दिवस काढले तर यातून सावरायला वेळ लागणार नाही.

अशा काळात माणूस म्हणून आपले माणूसपण अधिक आपण तराशून घेतले पाहिजे. आपल्या आयुष्याला गुदमरुन टाकणारे जर काही असेल तर ते बाहेर काढून आपण शुद्ध झाले पाहिजे. असे केले तरच आपल्याला आत दडलेल्या संवेदनेला, माणूसकिला हाक मारता येईल व ती हाक तिथपर्यंत पोहचू शकेल. आपल्याला मिळालेली ही संधी समजून आपण जो काही आपल्यातील रितेपण आहे ते भरुन काढले पाहिजे. निसर्गाच्या हाका आपण ऐकल्या पाहिजेत. निसर्गासाठी फार दूर जायची गरज नाही.

साधे आपल्या परसातल्या वेलीचे एक उदाहरण घेऊ. जाई-जुईचे फुल वेलीवरुन जेंव्हा पडते तेंव्हा ते गुरुत्वाकर्षणच्या नियमाप्रमाणे दणकण खाली आदळत नाही. स्वत:ला घिरक्या घेत-घेत ते अलगत जमिनीवर उतरते. अशी अनेक रहस्य आपल्या अवती-भोवती निसर्गाने देऊ केली आहेत. ही गुपिते अनुभवने म्हणजे एक प्रकारे नव्याने उगवण्यासारखे आहे. आपल्या आतला मानवतेचा झरा कधीही आटणार नाही एवढी काळजी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे. या काळाने दिलेली जी संवेदनेची ओल आहे ती सर्वदूर नदीच्या स्वभावाप्रमाणे हळू- हळू झिरपत जाईल. चलो कायनात बॉट लेते, है तुम मेरे बाकी सब तुम्हारा !

लेखक- “नदिष्ट”कार मनोज बोरगावकर, नांदेड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()