कोरोनाची ईडा पीडा टळो अन् जावईबापूंना रसाळी मिळो

file photo
file photo
Updated on

नांदेड - फळांचा राजा आंबा आणि आंब्याची चव चाखली नाही, असा माणूस शोधूनही सापडणार नाही. आंबा तर लहानापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडतो आणि त्यातला त्यात रसाळीचा बेत म्हटलं तर मग त्याला कोण नाही म्हणणार? पण यंदाच्या रसाळीला नेहमीसारखा गोडवा मिळणार नाही कारण तुम्हा आम्हा सगळ्यांच ठाऊक आहे. म्हणूनच रसाळीचे ते दिवस आठवले की, अनेकजण विशेष करुन जावईबापू नाराज झाले आहेत. कारण यंदा कोरोनामुळे अनेक जावईबापूंचा रसाळीचा पाहुणचार हुकला आहे. त्यामुळेच ईटा पिडा टळू दे...कोरोना एकदाच जाऊ दे...अन् रसाळी खायला मिळू दे...असे म्हणणारे अनेकजण भेटू लागले आहेत. 

कोरोना आणि लॉकडाउनचा फटका अनेकांना बसला. सर्वच बंद असल्यामुळे घरात अडकून पडलेल्या जावयांचा देखील यंदा सासुरवाडीचा पाहुणचार हुकला आहे. जावई आणि रसाळी हे समीकरण दरवर्षी नित्याचेच पण यंदा रसाळीला मुकावे लागणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी जावई देखील सासुरवाडीला अडकून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. एवढेच नव्हे तर गर्भवती असलेल्या महिलांना देखील माहेरी जाणे अवघड झाले आहे. 

सणासुदी, पाहुणचारालाही अनेकजण मुकले
कोरोनामुळे जगभरातील अनेक देशात लॉकडाउन आहे. त्याला भारतही अपवाद नाही. भारतातही गेल्या पन्नास दिवसांपासून लॉकडाउन आहे. त्यामुळे सर्व व्यवस्था जवळपास बंदच आहे. अनेकांचे आर्थिक नुकसानही झाले. त्याचबरोबर सणासुदीला आणि पाहुणचारालाही अनेकांना मुकावे लागले आहे. त्याच जावईबापूंचाही समावेश आहे. यंदा रसाळीचा पाहुणचार जवळपास ९९ टक्के जावयांना घेता आला नाही. रसाळीचा कसर भरुन काढणार तर कशी? अशीही चर्चा सुरु झाली आहे. 

बच्चे कंपनी मामाच्या गावाला मुकणार
लॉकडाउनमुळे गेल्या दीड महिन्यापासून शाळा बंद असून बच्चेकंपनी घरातच आहेत. शाळा बंद तसेच परिक्षाही नाहीत आता त्याचेही टेन्शन मिटले पण यंदा उन्हाळ्याच्या सुटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मामाच्या गावाला जाणारी बच्चे कंपनी यंदा या संधीला मुकणार आहे. त्यामुळे बच्चे कंपनीचा हिरमोड झाला आहे. कोरोनामुळे कुठे बाहेरही जाता येत नाही आणि घरीही कुणी येत नसल्यामुळे आता बच्चे कंपनीही वैतागून गेली आहे. 

जावईबापू रसाळीला मुकले...
अक्षयतृतीया आली की आंबे आणि रसाळीला सुरवात होते. दरवर्षी उन्हाळ्यात जावयाला बोलावून रसाळी करण्याची प्रथा अनेक वर्षापासून आहे. पण यंदा या रसाळीला जावईबापू मुकणार आहेत. कोरोनामुळे लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होणार असून ता. ३१ मे पर्यंत लॉकडाउन राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा जावईबापूंना रसाळीच्या पाहुणचाराला मुकावे लागणार आहे. 

काहीजण सासुरवाडीतच अडकले
अनेकांना रसाळीला मुकावे लागले असले तरी काही जण सासुरवाडीलाही अडकल्याची उदाहरणे समोर येऊ लागली आहे. पत्नीला माहेरी घेऊन गेलेले जावई सासुरवाडीला अडकून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, ते देखील दीड महिन्यापासून सासुरवाडीचा पाहुणचार घेऊन कंटाळले आहेत. त्यामुळे काहींनी आता आनलाइन अर्ज भरुन सासुरवाडीतून आपले घर गाठण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.