मराठवाडा (हैदराबाद) मुक्तीसंग्रामाचा दैदिप्यमान लढा...

File Photo
File Photo
Updated on

 ता. १३ सप्टेंबर १९४८ ला भारताचे तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल व संरक्षण मंत्री बलदेवसिंह यांच्या आदेशानुसार हैदराबाद संस्थानाला सैन्यदलाने शहर बाजूने वेढा घातला व त्याच्या सेनापतीने हैदराबाद लिंगमपल्ली येथे शरणागती पत्करली. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा हा परमोच्च बिंदू असला तरी, या भागातील स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे नेते, पेटलेली जनता याची हैदराबाद मुक्ती संग्रामाला तेजपुंज झालर आहे. येथील जनता एकीकडे इंग्रजांच्या सार्वभौम सत्तेखाली तर दुसरीकडे निजामाच्या राजवटीतील जुलमी, अत्याचाराची, सांस्कृतिक गळचेपी करणारी मदांध हुकूमशाही अशा दुहेरी पारतंत्र्यात होती. भारत इंग्रजांच्या जोखडातून ता. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला पण सातवा निजाम मीर उस्मान अली खान याच्या प्रतिगामी राजवटीतून तब्बल १३ महिन्यानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थानातील जनता स्वतंत्र झाली.

रझाकार संघटनेचा उदय

भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ६० ते ७० वर्षे लागली, पण स्वामी रामानंद तीर्थ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ दहा वर्षाच्या काळात अभूतपूर्व कामगिरी करून या भागाला मुक्ती मिळवून दिली. सातवा निजाम अत्यंत धर्मांध, धूर्त, हिंदूद्रष्टा व महत्त्वाकांक्षी होता. त्याने ‘इत्तेहादुल मुसलमान’ या संघटनेला राजाश्रय दिला. १९४० व झाली रझाकार संघटनेला कार्यरत केले. हैदराबाद राज्यात ७० टक्के हिंदू , १८ टक्के दलित व ११ टक्के मुस्लिम होते. तेलगू, कन्नड व मराठी भाषिक असलेल्या या प्रदेशात राजकीय भाषा उर्दू होती. इस्लाम हा राजधर्म म्हणून लादला. दुष्काळातही सामान्य जनतेची दुर्दशा झाली. खावयास धान्य नसले तरी, निजामांचे प्रतिनिधी जबरदस्तीने लेव्ही वसूल करणे, लुटालूट, स्त्रियांची अब्रू लुटणे, जाळपोळ करणे इत्यादी प्रकार वाढत चाललेले होते. रझाकार संघटनेत हजार मुस्लिम युवकांना सामील करून त्यांना शस्त्रे पुरविली व लष्करी प्रशिक्षण दिले. १९४५ आली लातूरचा वकील कासीम रझवी अध्यक्ष झाला. निझामी संस्थानात रझाकाराचे दोन लक्ष सदस्य व जोडीला इत्ताहादुलचे पाच हजार सदस्य अशी विध्वंसक शक्ती निर्माण झाली. हिंदूंची घरे जाळणे, जमिनी बळकावणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे इत्यादी अमानुष, लैंगिक कृतीचा समावेश होता. शैक्षणिक क्षेत्रात चौथी नंतरचे शिक्षण उर्दू भाषेतून घेणे अनिवार्य करण्यात आले होते. 

मराठवाड्यातील पाच जिल्ह्याचा समावेश

त्या काळात मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यात केवळ आठ माध्यमिक शाळा होत्या व तीन प्रदेशात औरंगाबाद, वरंगल आणि गुलबर्गा येथे प्रत्येकी एक महाविद्यालय होते. साक्षरतेचे प्रमाण केवळ चार टक्के होते. स्वामीजींनी म्हटल्याप्रमाणे व्यक्तिमत्त्व दुभंगून टाकणारे व अंतकरण दुबळे करणारे शिक्षण दिले जाते होते. अत्याचारी राजवट, गरिबी, धार्मिक सहिष्णुता, शिक्षणाची दुरवस्था यामुळे समाज चिंता, दहशत विषमता, गरीबीमुळे दुःख सागरत बुडालेला होता. याची नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून हिंदूधर्म सभा, आर्य समाज, वंदेमातरम व स्टेट काँग्रेसच्या आंदोलनाची सुरुवात झाली. स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. त्यापूर्वी महाराष्ट्र परिषद, आंध्र परिषद व कर्नाटक परिषदेचे कार्य चालू झाले होते. हैदराबादचे वामनराव नाईक व कोरटकर या मवाळ सुधारणावादी यांनी जनप्रबोधन व जनसंघटनांचे काम केले. बाबासाहेब परांजपे, हिप्परग्याचे कुलकर्णी बंधू, स्वामी रामानंद तीर्थ व शिक्षण शिक्षणप्रेमींची निजामाने शिक्षण क्षेत्रात चालवलेला दडपशाहीविरुद्ध राष्ट्रीय शिक्षण व मातृभाषेला प्राधान्य देऊन ठिकाणी राष्ट्रीय शाळा व महाविद्यालय स्थापन केली. यातून निजामशाहीत हजारो स्वातंत्र्यसेनानी देशभक्त निर्माण झाले. किर्तन, वाचनालय, साहित्य संमेलन इत्यादी सांस्कृतिक माध्यमातून अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्र परिषदेची स्थापना १९३७ झाली झाली व पहिले अधिवेशन परतूर (जिल्हा जालना) येथे झाले. स्वामी रामानंद तीर्थ, गोपाळ शास्त्री देव, दिगंबर बिंदू, श्यामराव बोधनकर, गोविंद भाई श्राफ, चंद्रगुप्त चौधरी, विनायकराव चारठाणकर, पुरुषोत्तम पिंपळगावकर, मुकुंदराव पेडगावकर, देवीसिंग चव्हाण इत्यादी हजारो कार्यकर्ते या परिषदेला आले होते. याला जोडूनच महिला परिषद घेतल्या जात. आंध्र प्रदेशाचे १९२१ सुरू झालेल्या आंध्र संगम संघटनेचे रूपांतर आंध्र परिषदेत झाले. १९३७ मध्ये कन्नड प्रदेशाची कर्नाटक परिषद सुरू झाली. या परिषदांमधून सामाजिक सुधारणा, शैक्षणिक उन्नती, शेती प्रश्न, राजकीय अधिकार, लोकाभिमुख शासन इत्यादी विषयावरील चर्चेमुळे हैदराबाद मुक्तिसंग्राम याची स्टेट काँग्रेसची स्थापनेची पार्श्वभूमी तयार झाली.

रोमांचकारी मुक्ती संग्राम 

श्रीमती सुशीलाबाई किर्लोस्कर, सरस्वती बोधनकर, पानकुवरबाई फिरोदिया इत्यादी महिलांच्या पुढाकाराने १९४६ पर्यंत महिला परिषदा घेण्यात आल्या. हैदराबाद मुक्ती लढ्यात स्त्रीशक्तीने मोठे योगदान दिले. १९२० ते १९४० या दरम्यान आर्य समाजाचे कार्यकर्ते विनायकराव कोरटकर, भाई बन्सीलालजी, नरेंद्रजी आर्य, विनायक विद्यालंकार इत्यादी कार्यकर्त्यांनी निजामशाहीला टक्कर दिली. गुंजोटी (जिल्हा लातूर) हे आर्य समाजाचे मुख्य केंद्र होते. प्रशासनाने निलंग्याच्या आर्य समाज मंदिर पाडले. हिंदूना बाटवून मुसलमान करण्याचा प्रयत्न केला. धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली, तरुण धाडसी कार्यकर्ते वेदप्रकाश आर्याचे गुंडांनी मुंडके कापले. बिदर जेलमधील श्यामलालजींना हाल हाल करून मारले. या क्रूर घटनांच्या पार्श्वभूमीवर तीन हजार आर्य समाजांनी स्वामींच्या नेतृत्वाखाली हैदराबाद सत्याग्रह केला. त्यानंतरच्या सत्याग्रहात १२ हजार आर्य समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. हैदराबाद मुक्ती लढ्यात १९२३ सालापासून हिंदू महासभेने हैदराबाद संस्थानात सर्वत्र शाखा उघडून हिंदु जनजागृती व संघटन केले मोर्चे सत्याग्रह निषेध करून निशस्त्र लढा दिला व हिंदू माणसात आत्मविश्वास निर्माण केला. स्वामीजींनी जून १९३८ मध्ये बी. रामकृष्ण, गोविंदराव नानल, हेडा इत्यादींच्या मदतीने हैदराबाद स्टेट काँग्रेस नावाची राजकीय संघटना स्थापन केली. निझामाने या संघटनेवर बंदी घातली. त्याच्या विरोधात सत्याग्रहींना राज्यव्यापी सत्याग्रह सुरू करताच, स्वामीजींना अटक करून पंधरा महिन्यासाठी तुरुंगात डांबण्यात आले. आठ वर्षे स्टेट काँग्रेसवर बंदी होती. त्या काळात आंदोलन ठप्प झाले होते. ही बंदी उठल्यानंतर १९४६ साली पुनश्च रोमांचकारी मुक्तीसंग्राम सुरु झाला. आठ वर्षाच्या मरगळीनंतर १९४६ साली हैदराबाद मुक्ती संग्रामाला पुनश्च एकदा ऊर्जा मिळाली. सनदशीर मार्गाने यश न आल्याने सशस्त्र लढ्याला महात्मा गांधीची संमती मिळाली. 

लढ्यात नांदेड जिल्हा अग्रभागी 

यानंतर सुरू झालेल्या लढ्यात नांदेड जिल्हा अग्रभागी होता. अनेक तरुणांना लष्करी प्रशिक्षण देण्यात आले होते. हजारो स्वातंत्र्यसैनिक भूमिगत राहून काम करत होते. उमरी बँक ऑपरेशन ही उमरी बँक लुटीची योजना डिसेंबर १९४७ आली. बिंदू, परांजपे, रांजणीकर, बोधनकर यांच्यासह अनेकांनी अंमलात आणली. नियोजन करून बंदुकांनी गोळीबार करून ११ बँक पहरेदार व कर्मचाऱ्यांचे मुडदे पाडले. १६ बैलगाडीतून नोटांची पोती भरून ती सोलापूरला ज्येष्ठ सहकाऱ्याकडे हवाली केली. ता. २६ जून १९४८ रोजी इस्लापूर पोलीस स्टेशनवर शस्त्रासासाठी हल्ला करण्यात आला. पेनगंगा नदीला पूर आल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमुळे लष्करी वेशात भाग घेतलेल्या जयवंतराव पाटील, किशोर शहाणे, साहेबराव बारडकर, रांजणीकर, तोष्णीवाल यांना अडचणी आल्या. नांदेड जिल्ह्यातील कंधारजवळ असलेल्या कल्हाळी गावातील आप्पासाहेब नाईक यांनी जबरदस्तीने शेतसारा वसूल करणाऱ्या उद्धट पोलीस अधिकाऱ्याला गोळी घालून ठार केले. त्यानंतर उद्भवलेल्या रझाकार व पोलीस यांच्या हल्ल्यात २६ रझाकारांना आप्पासाहेबांनी ठार केले. ता. सात ऑगस्ट १९४७ पासून सुरू झालेला झेंडा सत्याग्रह नांदेड येथील शामरावजी बोधनकर यांच्या तीन मजली इमारतीवरून शासकीय बंदी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी असतानाही भगवानराव गांजवे, गोपाळ शास्त्री देव, सरसर बंधू आदी दीडशे सशस्त्र कार्यकर्त्यांनी प्राणाची बाजी लावून तिरंगा फडकवत ठेवला. या मुक्तीसंग्रामात शेकडो महिलांनी स्वातंत्र्यसैनिकांना गुप्तपणे शस्त्र, पत्रके, बातम्या पुरवणे, परिषदा भरवून जागृती करणे इत्यादी कार्यक्रमासाठी मोठी मदत केली होती.

मुक्तीसंग्रामात अनेकजण सहभागी

इमरोज या उर्दू पत्राचे तरुण व राष्ट्रभक्त मुस्लिम संपादक शोयब उल्ला खान यांनी निजामाचे अत्याचार व कासीम रझवीच्या भाषणावर घणाघाती टीका केली. कासीम रझवीच्या गुंडांनी संपादकाची गोळ्या घालून हत्या केली. एक तेजस्वी मृत्यू असा त्यांचा गौरव केला जातो. हुतात्मा गोविंद पानसरे हा तरुण, निस्वार्थी देशभक्त शिक्षण सोडून बिलोली, धर्माबाद तालुक्यात जनजागृतीचे काम करीत होता. निजाम व रझवीविरुद्ध प्रभावी भाषण केल्यामुळे बिलोली, कुंडलवाडीकडे बैलगाडीतून जात असताना रझाकाराच्या गुंडांनी त्याला ठार केले. त्याच्या मृत्यू सभेला अनंत भालेरावांसह ४० हजार लोक जमा झाले होते. पोलिसांच्या गोळीबाराला त्यांनी दाद दिली नाही. पोलीस पळून गेले. वसमत तालुक्यातील वापटी गावचे जंगल सत्याग्रह फेम हुतात्मा बहिर्जी शिंदे यांनी पोलिस स्टेशनवर हल्ला केला. अनेक पोलिसांना यमसदनी पाठविले. मात्र या हल्ल्यात ते गोळी लागून धारातीर्थी पडले. अशा प्रकारे विविध प्रकारच्या बलिदानाने सुरू झालेला हैदराबाद मुक्तिसंग्रामात हजारो लोकांनी प्राणार्पण केले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यापेक्षा हा लढा अधिक सशक्त व तीव्र होता. सर्व थरातील लोक यात सामील झाले होते. म्हणूनच हैदराबाद मुक्तिसंग्राम हा भारतीय स्वातंत्र संग्रामाच्या इतिहासाला पूर्णत्वाकडे नेणारे एक दैदिप्यमान पान होय.
शब्दांकन ः शिवचरण वावळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.