बिलोली - पाच वर्षाची मुदत संपलेल्या बिलोली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी गाव पातळीवर मोर्चेबांधणी सुरू असून अनेकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता गावागावात राजकारण वातावरण तापू लागले आहे.
बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीपैकी ६४ ग्रामपंचायती मुदत संपली आहे. या सर्व ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुक विभाग देखील तयारीत गुंतला असून दुसरीकडे राजकीय वातावरणही थंडीत तापू लागले आहे.
पॅनल प्रमुखांकडून चाचपणी सुरू
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका शांततेत पार पडल्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध अनेकांना लागले आहेत. त्या अनुषंगाने गावपातळीवर मोर्चेबांधणी सुरू असून गाव पातळीवर पॅनल प्रमुखांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. आपल्या आवडीच्या राजकीय पक्षाबद्दल स्वाभिमान बाळगणारे अनेक जण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मात्र पक्ष बाजूला ठेवून ग्रामपंचायतीत शिरकाव करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
मोर्चेबांधणीला झाली सुरुवात
सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे व प्रत्येक ग्रामपंचायतीची अंतिम मतदार यादी तयार होत असल्यामुळे तसेच प्रभाग निहाय आरक्षणाच्या सोडती जाहीर झाल्यामुळे पॅनल प्रमुख प्रामुख्याने आपल्या सोयीचा व आपल्या मर्जीतील उमेदवाराचा शोध घेताना दिसून येत आहेत. निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कशी ठेवायची? याची आखणी होत आहे.
हेही वाचलेच पाहिजे - चांगली बातमी : कुटीरोद्योगाच्या माध्यमातून शिवणी येथील बचत गटांच्या महिलांना रोजगार
निवडणुका अटीतटीच्या होण्याची शक्यता
नूतन वर्षात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ता. १५ रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे आत्तापासूनच कार्यकर्ते कामाला लागले आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षासह इतर पक्षाचे पदाधिकारी असलेल्या काही मातब्बर मंडळीच्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका अटीतटीच्या होण्याची शक्यता आहे. राज्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची सरकार चालवण्यासाठी केलेली महाआघाडी त्या त्या पक्षांना किती फायदेशीर ठरेल, हे येणाऱ्या काळात निश्चित होणार आहे.
पाच वर्षाच्या काळात विकासाची पाटी कोरी
मागील पाच वर्षाच्या काळात गाव पातळीवर किती विकासाची कामे झाली? याचा अंदाज घेतल्यास बहुसंख्या गावांमधील रस्ते, नाल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वीज आणि स्वच्छतेचे प्रश्न गंभीर आहेत. गाव पातळीवर दर्जेदार विकासाची कामे केली, हे छातीठोकपणे सांगणारा एकही सरपंच व सदस्य सापडत नसल्याचे चित्र आहे. काही बोटावर मोजण्याइतक्या गावात मागील पाच वर्षात विकासाची कामे झाली आहेत. निवडणुकीच्या वेळी ढिगभर आश्वासन देणारे व निवडून आल्यानंतर त्या पदाचा स्वार्थासाठी उपयोग करणाऱ्यांची संख्या अधिक झाल्यामुळे या निवडणुकीत ज्याचे आर्थिक पारडे जड आहे, तोच पुन्हा बाजी मारण्याची शक्यता आहे.
संपादन - अभय कुळकजाईकर.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.