नांदेड : जिल्ह्यातील सर्व आमदार शेतकरी संघटनेच्या पाठीशी, खा. चिखलीकर यांनीही केले शरद जोशींना अभिवादन

file photo
file photo
Updated on

नांदेड - शेतकऱ्यांचे पंचप्राण दिवंगत शरद जोशी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इफ्को टोकिओ कंपनीने विमा परतावा दिला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष उफाळून आल्याचे दिसून आले. शेतकरी संघटनेने पुढाकार घेतल्यामुळे या प्रश्नी जिल्ह्यातील सर्व पक्षांचे आमदार तसेच खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह सर्वांनी शेतकरी संघटनेच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले, अशी माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी दिली.

शनिवारी (ता. १२) नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. यावेळी जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व सर्व पक्षांचे सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी अभिवादन केले. शरद जोशींच्या स्मृतीस अभिवादन केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी आपसात विचारविनिमय करून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून इफ्को टोकियो या कंपनीला धडा शिकवण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून व न्यायालयीन लढा देऊन वठणीवर आणण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. धोंडीबा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबत न्यायालयात दाद मागण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करू, असे उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासन दिले. बिलोली तालुक्यातील एक प्रकरण न्यायालयात दाखलसुद्धा करण्यात आले असून ते प्रातिनिधिक असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी न्यायालय राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ही प्रकरणे निकाली काढणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली.

यावेळी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा केली. याबाबतीत आपण केंद्रीय मंत्र्यांना माहिती देणार असून शेतकरी संघटनेचे एक शिष्टमंडळ प्रत्यक्ष भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच यावेळी जिल्ह्यातील राजकीय युवाशक्तीसुद्धा शेतकरी संघटनेला पाठिंबा दर्शवण्यासाठी व शरद जोशी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी नवा मोंढा मैदानावर उपस्थित झाले होते. यामध्ये माजी आमदार अविनाश घाटे, रवी पाटील खतगावकर, संजय पाटील रातोळीकर, माधव पाटील देवसरकर, भानुदासराव धोंडगे, आर. पी. कदम, रमेश कदम, गोरख पा. वसमतनगर, दत्ता  पा. कोळीकर, प्रल्हाद पा. हडसनकर, माधवराव सिंधीकर, युवराज शिंदे आदींसह जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे प्रत्येक तालुक्यातील अध्यक्ष व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

शेतीतील पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या खरिपाच्या पिकांचा विमा उतरवला होता. यावर्षी परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, भुईमूग, उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ही कंपनी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रकरणात सामूहिक तक्रार दाखल करून व ग्राहक मंचात प्रकरण दाखल करून न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एकत्र येण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे दहाही आमदारांनी भ्रमणध्वनीद्वारे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांना या पीक विम्याच्या लढ्यात आपण तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन दिले. त्यामुळे आता हा इफ्को टोकियो कंपनीसाठी मोठा झटका ठरणार असल्याचे मत शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.