नांदेड : लहान, येळेगाव, देगाव, पार्डी, मालेगावातील लक्षवेधी लढतीकडे अर्धापूर तालुक्याचे लक्ष

file photo
file photo
Updated on

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील लहान, येळेगाव, देगाव, पार्डी, मालेगावसह अन्य ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात येळेगावात छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे, माजी सभापती आनंदराव कपाटे, देगावात भगवान तिडके, राजकुमार जाधव, मालेगावात माजी उपसभापती डाॅ लक्ष्मण इंगोले, नागोराव इंगोले, पार्डीत माजी सरपंच निळकंठ मदने, सदाशीवराव देशमुख, लहानमध्ये संजय देशमुख लहानकर, सुधाकर इंगळे यांचा समावेश आहे. तर बारसगावातील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य बबन बारसे, खैरगावात काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाने, कामठ्यात बालाजी स्वामी, कोंढ्यात पप्पु पाटील कोंढेकर, पांगरीत दत्ता पाटील पांगरीकर यांना आपले राजकीय कौशल्य दाखवावे लागणार आहे.

अर्धापूर तालुक्यातील काही पदाधिकारी तालुक्यासह जिल्हा पातळीवर नेतृत्व करतात. पदाधिका-यांच्या बहूतांश गावात विरोध गटाची सत्ता असते. त्यामुळे आपल्या गावात आपल्या गटाची सत्ता रहावी यासाठी स्थानिक पदाधिकारी प्रचारात सक्रिय सहभागी झाले आहेत. येळेगाव ग्रामपंचायत निवडणूक तिरंगी होत असली तरी मुख्य लढत माजी सभापती आनंदराव कपाटे व छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे, यांच्या पॅनल मध्ये खरी लढत होत आहेत. हे दोघेही एकाच वार्डातून निवडणूक लढत असल्यामुळे या लक्षवेधी लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

देगावात दोन पॅनलमध्ये सरळ लढत आहे. येथील निवडणूक तालुक्यातील प्रमुख लढत मानली जात आहे. भाऊरावचे आध्यक्ष गणपतराव तिडके यांचे चिरंजीव भगवान तिडके  व राजकुमार जाधव, संभाजी जाधव यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. गेल्या वेळेसच्या निवडणूकीत भगवान तिडके यांच्या पॅनलला बहूमत मिळाले नव्हते. यंदा या दोन पॅनलमध्ये जोरदार लढत होत आहे. येथे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचा-याचा मतदानाचा मुद्दा दरवेळी गाजतो. या कर्मचा-यांनी मतदान करु नये अशी मागणी करण्यात आली आहे. लहान येथील निवडणूकीकडे जिल्हाचे लक्ष लागले आहे काॅग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर व माजी सरपंच सुधाकर इंगळे यांच्या पॅनलमध्ये लढत होत आहे. गेल्या वेळी निवडणूक बिनविरोध झाली होती. या वेळेसच्या लढतीत कोण बाजी मारणार या बाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे.

पार्डी येथील राजकारणात शब्दाला विशेष महत्व दिले जाते. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सदाशीवराव देशमुख हे तालुक्यात एक मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. तर माजी सरपंच मारोतराव देशमुख, निळकंठ मदने हे पार्डीच्या राजकारणात महत्वाचे आहेत. या दोन पॅनलची लढत लक्षवेधी आहे. तर निळकंठ मदने यांच्या पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध विरोध निवडून आले आहेत. 

मालेगाव ही तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायत. येथे निवडणूक तिरंगी होत आहे. खरी लढत डाॅ लक्ष्मण इंगोले यांचे पॅनल व सर्वपक्षीय पॅनल अशी लढत आहे. सर्वपक्षीय पॅनलमध्ये दिग्गज आहेत तर डाॅ लक्ष्मण इंगोले एकटे किल्ला लढवत आहेत. काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाने यांच्या खैरगावात दोन पॅनलमध्ये लढत होत आहे. कामठ्यात भाजपचे तालुका अध्यक्ष बालाजी स्वामी व माजी सरपंच शिवलिंग स्वामी यांच्या पॅनलमध्ये लढत चांगलीच गाजत आहे. तर पांगरीत शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील पांगरीकर व माजी सरपंच नामदेव दुधाटे यांच्या पॅनलमध्ये लढत होत आहे. कोंढ्यातील तिरंगी लढतीत पप्पु पाटील कोंढेकर, माजी उपसभापती बालाजी कोंढेकर व शेतकरी संघटनेच्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. तर गेल्यावेळेसच्या निवडणूकी प्रमाणे यंदाही  जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे एकतर्फी विजय संपादन करण्यासाठी व्युहरचना रचत आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.