नांदेड : सांगा जगायचं कसं?; व्यापारी, उद्योजकांना पडला प्रश्न

नांदेडचा बिहार होऊ नये, एवढीच अपेक्षा
नांदेड : सांगा जगायचं कसं?; व्यापारी, उद्योजकांना पडला प्रश्न
Updated on

नांदेड : शहरात मागील घडलेल्या गोळीबाराच्या घटना, गॅंगवार, तरूणांकडे सापडलेले गावठी कट्टे, खंडणीच्या धमक्या आदी प्रकार पाहता शहरातील अनेक व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक हतबल झाल्याचे मंगळवारी (ता. पाच) घडलेल्या घटनेनंतर दिसून आले. सांगा जगायचं कसं? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला असून जिल्हा प्रशासनासह पोलिस विभागाने तत्काळ यावर तोडगा काढून अशा खंडणीबहादरांच्या मुसक्या आवळाव्यात. त्याचबरोबर नांदेडचा बिहार होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे जवळपास सर्वच व्यवहार बंद होते. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर गेल्या दोन तीन महिन्यापासून अनेक व्यवहार सुरळीत होऊ लागले. दरम्यानच्या काळात बांधकाम व्यवसायासह इतरही व्यवसायाला चांगले दिवस येऊ लागले. नांदेड शहर आणि परिसरातील जागांचे भावही गगनाला भिडले. कोरोनाच्या पूर्वी ज्या प्लॉटची किंमत दहा ते पंधरा लाख रुपये होती ती जवळपास २५ ते ३० लाखापर्यंत म्हणजेच दुप्पट झाली. प्लॉट, रो हाऊस, बंगलो यांच्याही किंमती दुपटीने वाढल्याचे चित्र होते. बॅँकेत व्याजदर कमी असल्याने त्याचबरोबर सोन्याचांदीत किंवा शेअर बाजारातही पैसे गुंतवणुक करून फारसा परतावा येत नसल्याने अनेकांनी प्लॉट, फ्लॅट, रो हाऊस, बंगलो, शेती, सेंकड रो हाऊस आदीमध्ये गुंतवणुक करण्यास सुरूवात केली. त्यामुळे अल्पावधीतच बांधकाम व्यावसायाला आणि त्यावर अवलंबून असलेल्या इतर व्यवसायांना चांगले दिवस सुरू झाले. त्यातच स्पर्धा देखील वाढली तसेच खंडणी, वसुलीसारखे गैरप्रकारही सुरू झाले.

गुंडागर्दी करून दहशत पसरविणाऱ्यांची संख्याही वाढत गेली आणि त्यातूनच गोळीबाराच्या घटना, गॅंगवार, तरूणांकडे सापडलेले गावठी कट्टे, खंडणीच्या धमक्या आदी प्रकार सुरू झाले. याबाबतच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. पण जेवढे गांभीर्याने घ्यायला हवे होते तेवढे लक्ष दिले गेले नाही. पोलिस विभागाकडे सुरवातीपासूनच असलेला कामाचा ताण, विविध कार्यक्रमांचा बंदोबस्त, अपुरे मनुष्यबळ आदी समस्या पाहता अवैध धंदे, गुंडागर्दी करणारे, धमक्या देणारे, खंडणी मागणाऱ्यांचे फावले. त्यामुळे मागील काळात काही हॉटेल व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, मोंढ्यातील व्यापारी, उद्योजक यांना खंडणी आणि धमक्यांना सामोरे जावे लागले. त्यातील काही जणांनी पोलिसात तक्रारीही दिल्या होत्या. आता पुन्हा एकदा अशा खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी सतर्क राहून जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींची मदत घेऊन गुंडागर्दीचा बंदोबस्त करण्यासाठी आक्रमक झाले पाहिजे, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.