नांदेड : विकासाची प्रक्रिया ही निरंतर असते. एक समस्या सुटुन विकास झाला की लगेच दुसरी समस्या विकासाशी निगडीत निर्माण होते. त्यामुळे या विकास प्रक्रियेशी सोबत चालून जनतेचा विश्वास संपादन करून उर्वरित विकासाची कामे पूर्ण करण्याचा ध्यास मी घेतला आहे. ती सर्व विकासकामे सुरू झाली आहे. आगामी काळात राज्यात विकासाच्या बाबतीत नांदेड शहर क्रमांक एकचे अव्वल ठरेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
महापालिकेच्या वतीने हनुमानगड प्रभागात स्वातंत्र्य सैनिक कॉलनी येथील विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिकेचे भूमीपूजन माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर अध्यक्षस्थानी होते.
यावेळी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार अमर राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, ओमप्रकाश पोकर्णा, बी. आर. कदम, महापौर जयश्री निलेश पावडे, उपमहापौर अब्दुल सत्तार, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, सभापती अपर्णा नेरलकर, माजी महापौर शैलजा स्वामी, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, दयानंद वाघमारे, सरिता बिरकले, अतिरिक्त आयुक्त गिरिष कदम आदींची उपस्थिती होती.
माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, आजवर जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहिलो आहे. माजी गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्वप्नातील विकासाची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याचे ध्येय मी प्रामाणिकपणे साकारण्याचे काम केले आहे. माझी विकास कामे करण्याची प्रक्रिया वेगळी आहे.
मी आधी काम करतो आणि नंतर घोषणा करतो. त्यामुळे जनतेचा विश्वास मी संपादन केला आहे. हा विश्वास जनतेने माझ्यावर कायम ठेवावा म्हणजे उर्वरित विकासाची कामेही पूर्ण करता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सभापती किशोर स्वामी आणि माजी महापौर शैलजा स्वामी यांनी स्वागत केले.
माझी कामे का अडवता?
महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही दोघेही मंत्री असताना तुमची कामे मी केली. आता तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर माझी कामे कशासाठी अडवत आहात, असा सवालही श्री. चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.
सत्ता येते आणि जाते परंतु विकासकामाला विरोध करण्याची भूमिका आपण कधी घेतली नाही, असा दावाही त्यांनी केला. तसेच नुसते फोटो काढून आणि इकडून तिकडे फिरून डोंगार व हाटील पाहणे, एवढ्याने सगळे काही ओक्के होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.