Nanded News : नांदेड लोकसभा निवडणुकीत ४३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून आता २३ उमेदवार रिंगणात आहेत, तसेच सोमवारी (ता. ८) उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, निवडणुक प्रचारादरम्यान विविध पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांसह नेतेमंडळींना प्रचारासाठी गावबंदी कराल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवारी दिला.
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे अर्ज दाखल झालेल्या ६६ उमेदवारांपैकी ४३ उमेदवारांनी अर्ज परत घेतल्यामुळे आता २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून येत्या ता. २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. राऊत यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, सायबर सेलचे गंगाप्रसाद दळवी आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, मतदान हा लोकशाहीतील महत्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे या राष्ट्रीय कर्तव्याला आडकाठी आणण्याचा प्रयत्न आणणे चुकीचे आहे. नांदेड जिल्ह्यात गावबंदीच्या घटना घडू नयेत, याची दक्षता प्रशासनातर्फे घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील ६३ गावात गावबंदीचे फलक लागले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार हे फलक काढण्यात आले आहेत. निवडणुकीत राजकीय पक्षांच्या नेत्यांना कुणी जर गावात येण्यास प्रतिबंध करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी ७४ उमेदवारांनी ९२ अर्ज दाखल केले होते. त्यातील आठ उमेदवाराचे नऊ अर्ज छाननीत अवैध ठरले होते. त्यानंतर ६६ उमेदवारात निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी ४३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.
त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात २३ उमेदवार शिल्लक आहेत. यासाठी दोन बॅलेट मशीन लागणार आहेत. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या ४८ तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी २२ तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे त्यांनी सांगितले.
असे असतील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात २३ उमेदवार शिल्लक असून त्यामध्ये दहा राजकीय पक्षाचे तर १३ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. प्रताप पाटील चिखलीकर (भाजप), वसंतराव चव्हाण (कॉँग्रेस), ॲड. अविनाश भोसीकर (वंचित बहुजन आघाडी), पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पक्ष), अब्दुल रईस अहेमद (देश जनहीत पार्टी), कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग), राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी), रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष),
सुशीला निळकंठराव पवार (सम्यक जनता पार्टी), हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी), सुरज देवेंद्र कदम, कल्पना संजय गायकवाड, गजानन दत्तराम धुमाळ, जगदीश लक्ष्मण पोतरे, देवीदास गोविंदराव इंगळे, नागेश संभाजी गायकवाड, निखील लक्ष्मणराव गर्जे, भास्कर चंपतराव डोईफोडे, महारूद्र केशव पोपळाईतकर, सुरेश गोपीनाथ राठोड, लक्ष्मण नागोराव पाटील, साहेबराव भिवा गजभारे, ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे (सर्व अपक्ष) यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.