वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : कृषी केंद्राच्या माध्यमातून विक्री केले जाणारे रासायनिक खताचे भाव सध्या वधारले असून रासायनिक खताच्या वापरामुळे उत्पन्नात वाढ झाली असली तरी रासायनिक खताच्या अती वापरामुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. तसेच रासायनिक खते महागडी असल्यामुळे उत्पादन खर्चात देखील वाढ झाली आहे. शिवाय जमिनीची पोत खालावली असून उत्पादित माल संपूर्ण रसायनयुक्त बनल्याने मानवाच्या आरोग्यावर देखील याचा विपरीत परिणाम होत आहे. या सर्व समस्या सोडवण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांसाठी शेणखत सेंद्रिय खत वापरणे काळाची गरज असल्याने सध्या वाई बाजार परिसरात शेतकरी गोपालन करणार्याकडे असलेल्या उकिरड्याचे सौदे करुन ठेवत असल्याने शेण खताच्या मागणीत वाढ झाली आहे.
माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरातील काही शेतकरी रासायनिक शेती कमी करुन शेणखताचा वापर करुन तसेच शेतात जीवामृत बनवून जैविक शेतीकडे वळत आहेत. दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क विविध वनस्पतीपासून जैविक कीटकनाशके तयार करण्याचे काम केले जात आहे. रासायनिक शेतीचे बजेट वाढल्याने ती सध्या शेतकऱ्यांसाठी न परवडणारी बाब बनत चालली आहे. शेतात शेणखताचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता कायम ठेवण्यास मदत होईल त्याचप्रमाणे उत्पादित मालाची प्रत सुधारुन उत्पादन खर्चातसुद्धा बचत होणार असल्याने वाई बाजार परिसरात शेतकऱ्यांनी आता शेतात शेणखताचा वापर करण्याचा जवळपास निर्धार केल्याने शेणखताच्या मागणीत वाढ झाली आहे.
रासायनिक खताचे विपरीत परिणाम आजाराला खुले आमंत्रण देत आहे. शेती व्यवसायात ही अधिक उत्पादन कसे घेता येईल याकडे सार्यांचे लक्ष केंद्रित झाले असल्याने उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. महागड्या रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर सध्या वाढला आहे. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य नष्ट होत असून भुसभुशीत जमीन कडक बनत चालली आहे. यामुळे जमिनीची पत तर घसरत आहेच सोबत रासायनिक खताच्या अतीवापरामुळे मानवाच्या आरोग्यस हानिकारक ठरत आहे. शेणखत वापरल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन पर्यायाने जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि विषमुक्त अन्न धान्य मिळाल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे उत्पादनात देखील वाढ होण्यास मदत होईल आणि उत्पादन खर्चातही मोठी बचत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात शेणखत तयार करण्यास सुरुवात करण्याची गरज आहे असे झाल्यास उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे.
झटपट प्रतिसाद देणारे रासायनिक खतामुळे जमीन कडक बनत चालली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे जमिनीत बुरशीजन्य आजार निर्माण होऊन करपा, लाल्या व मरसारखे आजार पिकांवर पहायला मिळत आहेत. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत यासारखे सेंद्रिय खते शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तयार केल्यास महागड्या रासायनिक हाताला चांगला पर्याय मिळेल.
- गणेश नारायणराव टनमने, शेतकरी, हरडफ ता. माहूर
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.