नांदेड - यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडून वाळून गेल्यामुळे पिकाचा उतारा कमी आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. याबाबत शासनाच्या निर्देशानुसार महसूल, कृषी आणि मदत व पुनर्वसन विभागांने संयुक्तपणे केलेल्या पंचनाम्यानुसार जिल्ह्यातील ४७८ गावातील दोन लाख ११ हजार ४४९ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ६८६ हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला आहे.
जिल्ह्यात सोयाबीन पिकावर मागील काही वर्षापासून रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यंदा सोयाबीनवर पिवळा मोझॅक हा विषाणुजन्य रोग आणि खोडकुज व मुळकुज या बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीनला बाधा झाली होती. परिणामी उत्पादनात ४० ते ८० टक्क्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज कृषीच्या तज्ज्ञांनी व्यक केला. याबाबत शासनाने पंचनामे करुन नुकसानीचे क्षेत्र करण्याचे निर्देश दिले होते.
पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानातील बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला. या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातही दिसून आल्याने सोयाबीनचे पिक पिवळे पडून वाळले होते. त्याचबरोबर त्याचा उताराही कमी येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
शासनाला अहवाल पाठवला
याबाबत, जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार संयुक्त यंत्रणांनी केलेल्या पंचनाम्यात जिल्ह्यातील ४७८ गावातील सोयाबीन पिकाला या रोगाची बाधा झाली. यात जिल्ह्यातील कंधार, लोहा, मुदखेड, नायगाव व नांदेड या तालुक्यातील दोन लाख ११ हजार ४४९ शेतकऱ्यांच्या ९३ हजार ६८६ हेक्टर क्षेत्राला बाधा पोचल्याचा अहवाल शासनाला पाठविला आहे.
परंतु यात नुकसानग्रस्तांना लागणाऱ्या मदत निधीबाबत मात्र माहिती मागविली नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना भरपाई मिळणार का? असा प्रश्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.