Nanded City
Nanded Citysakal

Temperature : नांदेड शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढते; उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळीत

गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे.
Published on
Summary

गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे.

नांदेड - गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. सोमवारी (ता. १५) नांदेडचे तापमान सोमवारी कमाल ४२.२ तर किमान २७ अंश सेल्सिअस होते. परिणामी गत तीन दिवसांपासून उष्णतेच्या या उसळलेल्या लाटेने त्याचा परिणाम जनजीवनावर होत असून, दुपारी बाजारपेठेमध्येही शुकशुकाट दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यात शहरात जिल्ह्यावासियांनी उन्हाळ्यातच पावसाळ्याचा अनुभव घेतला. दररोज ढगाळ वातावरण, पाठोपाठ वादळी वारे, विजांचा कडकडाट, मध्यम स्वरूपाचा पाऊस, मधूनच गारांचा तडाखा असे हे चित्र अनुभवावयास मिळाले. परंतु, या आठवड्यात हे चित्र अक्षरशः बदलले आहे. दररोज उन्हाचा पारा वाढतच आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाचा पारा वाढत असल्याने तसेच १२ वाजल्यानंतर उन्हाच्या लाटेमुळे मुख्य चौक व रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आपापले दैनंदिन व्यवहार दुपारी बारा वाजेच्या आत तसेच सायंकाळी पाच वाजल्यानंतर करण्याला पसंती दिली आहे.

उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झालेले आहेत. मे महिन्याचे पंधरा दिवस बाकी आहेत. त्यामुळे मेचा पुढील पंधरवाडा जिकीरीचा जाणार, असे चित्र स्पष्ट दिसत आहे. सद्यस्थितीत उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत. पाठोपाठ लग्नसराईचा धुमधडाका सुरु आहे. त्यातच उष्णतेच्या लाटेने नागरिकांना अक्षरशः असाह्य केले आहे.

लग्नसराईच्या काळात बाजारपेठांमधून मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळेल, अशी अपेक्षा असताना बाजारपेठाही थंड आहेत. या उलट शितपेयगृह चालकांचे दिवस तेजीत आले आहेत. अवकाळी पावसामुळे गेल्या दीड - दोन महिन्यात कुलर्स व पंखे अडगळीस पडले होते. ते आता बाहेर निघाले आहेत. दिवसभराचा असह्य असा उकाडा सहन करावा लागत असल्याने नागरिक दिवसा व रात्री मोठ्या प्रमाणावर कुलर्स, पंखे व एसीचा वापर करत आहेत.

हे लक्षात ठेवा

  • थंड हवामान व वातानुकूलित खोलीतून थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊ नये

  • अनेक तास उष्ण वारा आणि सूर्यप्रकाशात राहू नये

  • कडक उन्हाळ्यात खूप व्यायामही नको

  • शरीराला गरजेपेक्षा कमी पाणी पिऊ नये

  • सुती कपड्यांच्या वापर करावा

  • उष्ण वातावरणात मद्यपान टाळावे

  • आहारात काकडी, कलिंगड, ताक यासारख्या थंड पदार्थांचा समावेश करा

  • दुपारी बाहेर पडणे टाळावे

  • उष्माघाताची लक्षणे - अस्वस्थपणा, थकवा, ताप, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे, अतिसार, हृदयाचे ठोके जलद होणे, शरीराचे तापमान १०६ अंश सेल्सिअसपर्यंत जाणे.

उष्णतेची सर्वाधिक जोखीम मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना आहे. त्याचप्रमाणे कमकुवत प्रतिकारशक्ती असणाऱ्यांना घराबाहेर पडू नये. ऊन लागल्यास थंड आणि सावलीच्या ठिकाणी व्यक्तीला ठेवावे. उष्माघाताचा सर्वाधिक परिणाम किडनीवर होतो. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे लघवी खूप कमी होते किंवा थांबते.

- डॉ. अमोल पाटील, बालरोगतज्ज्ञ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.