नांदेड : अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा असून त्यापैकी अनेकांना निवारा मिळवून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांची मोठी मदत झाली आहे. त्याचबरोबर त्या त्या शहरासह देशाच्या विकासात देखील बांधकाम व्यावसायिकांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील फुरडे यांनी केले.
नांदेडला शनिवारी (ता. २३) दुपारी क्रेडाई महाराष्ट्रातर्फे आयोजित सर्वसाधारण सभेचे उद्घाटन अध्यक्ष श्री फुरडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, भावी अध्यक्ष प्रमोद खैरनार, माजी अध्यक्ष राजीव पारीख, मानद सचिव सुनील कोतवाल, खजीनदार शशीकांत जिद्दीमनी, राज्याचे उपाध्यक्ष रवी कडगे, नांदेड क्रेडाईचे अध्यक्ष नितीन आगळे, सचिव अभिजित रेणापूरकर यांच्यासह राज्यभरातून ६२ शहरातून पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या क्रेडाई महाराष्ट्रतर्फे पदाधिकारी आणि सदस्यांना विविध उपक्रमांची व नाविण्यपूर्ण नवीन माहिती व्हावी, यासाठी सभा, संमेलने वेगवेगळ्या शहरात घेत असते. त्यानुसार नांदेडला घेण्यात आलेल्या सभेत रेरा आणि सोसायटी नोंदणी या विषयावर आदित्य बेडेकर, प्रोजेक्ट मॅनेजमेंट या विषयावर विपुलकुमार गर्ग, ताण तणाव व्यवस्थापनावर डॉ. नंदकुमार मुलमुले, शहराच्या इमेज बिल्डिंग आणि ब्रॅण्डींग यावर माजी अध्यक्ष राजीव पारिख यांनी मार्गदर्शन केले.
महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी नांदेड शहरामधील पायाभूत सुविधांचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. मानद सचिव कोतवाल यांनी सचिवीय अहवाल सादर केला. खजीनदार जिद्दीमनी यांनीही मनोगत व्यक्त केले. क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रवी कडगे आणि नांदेडचे अध्यक्ष नितीन आगळे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी स्वागत केले. ॲड. गजानन पिंपळखेडे यांनी सुत्रसंचालन केले तर नांदेडचे सचिव अभिजित रेणापूरकर यांनी आभार मानले. यावेळी शहरातील ज्येष्ठासह इतर बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.
२८ प्रकारचे कायदे पाळावे लागतात
क्रेडाईची शहर, राज्य आणि देशात संघटना आहे. देशातील २३ राज्यात तर राज्यातील ६२ शहरात संघटना कार्यरत आहे. बांधकाम व्यवसाय करताना जवळपास २८ प्रकारचे कायदे पाळून सर्व कामे पूर्ण करावी लागत असल्याचे अध्यक्ष सुनील फुरडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आता जवळपास सर्व प्रक्रिया आॅनलाइन झाल्या आहेत त्यामुळे काही ठिकाणी अडचण येत असली तरी त्यातून मार्ग काढत आमचे प्रयत्न सुरू असतात. नांदेडला बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची झालेली हत्या ही दुर्देवी घटना आहे. राज्यभरात मात्र असे प्रसंग कुठेही निर्दशनास आले नाहीत. ग्राहक आणि प्रशासन यांच्यातील बांधकाम व्यावसायिक हा दुवा असून सर्वांचेच चांगले सहकार्य मिळाले तर शहराचा आणि पर्यायाने राज्य, देशाचा विकास होण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.