बिलोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मातब्बर राजकीय मंडळींबरोबरच तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर झाले आहे. नेत्यांनी पक्षांतर केले असले, तरी मतदार त्यांच्या पक्षांतराला स्वीकारून मतांचे पक्षांतर करतील काय? याबद्दल साशंकता व्यक्त केली जात असून, शहरी व ग्रामीण भागातील मतदार यंदा तटस्थ भूमिका घेऊन मतदान करतील, अशी चर्चा आहे.
देगलूर-बिलोली तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व बिलोलीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर हे दोघेही पक्षांतर करून भाजपत दाखल झाल्यामुळे त्यांच्याशी निगडित असलेले काँग्रेसचे काही पदाधिकारी कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष नगरसेवकांनी पक्षांतराची भूमिका घेऊन पुढील राजकीय वाटचाल सुरू करू पाहात आहेत.
लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आणि नायगावचे भूमिपुत्र माजी आमदार काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यात प्रमुख लढतीची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडी व एमआयएम पक्षाने उमेदवार निवडणुकीत उतरविल्यानंतर लोकसभेची निश्चित दिशा ठरू शकेल. मागील पाच वर्षांत प्रताप पाटील चिखलीकरांनी तालुक्यातील अनेक कार्यक्रमांत सहभाग नोंदविला असला, तरी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांच्याकडून ठोस निर्णय घेण्यात आले नसल्याची नाराजी आहे.
दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा जुना मूळ तालुका बिलोली होता. त्यांचे वडील दिवंगत माजी आमदार बळवंतराव चव्हाण हे बिलोली पंचायत समितीचे पहिले सभापती होते, शिवाय त्यांची बिलोली तालुक्याची नाळ जुळली होती. ती अद्यापही टिकवून ठेवण्यात चव्हाण घराण्याला यश आले आहे. ही जमेची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण पक्षांतराची भूमिका घेऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत असले, तरी नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या पक्षांतराला मतदार मान्यता देतीलच, याबद्दल तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. शिवाय दलित-मुस्लिम समाजातील मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. दोन्ही उमेदवारांकडून सध्या जोमाने प्रचार सुरू असून, प्रत्यक्ष गावभेटीवर भर देऊन पक्षाची व उमेदवाराची भूमिका स्पष्ट केली जात आहे.
नांदेड लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी बिलोली येथील आनंद गार्डनमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. याच ठिकाणी मंगळवारी (ता. दोन) भाजप उमेदवाराची सभा झाली. मागील आठवड्यापासून उन्हाच्या तीव्रतेत प्रचंड वाढ झाल्याने केवळ कार्यकर्ते या निवडणूक प्रचारात सहभागी झाले असून, मतदार मात्र यापासून लांबच आहेत.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.