नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेने पुन्हा एकदा नव्या वर्षात ता. ३१ जानेवारीपर्यंत गुंठेवारी विकास योजनेला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात तब्बल ३५० प्रस्ताव दाखल झाले आहेत. गुंठेवारीसाठी आत्तापर्यंत सहा वेळा मुदतवाढ देण्यात आली असून पुन्हा एकदा गुंठेवारीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून पथक गठीत करण्यात आले आहे.
राज्य शासनाने ज्यांची बांधकामे नियमानुसार नाहीत किंवा भूखंडाची गुंठेवारी केली नाही त्यांच्यासाठी ता. ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची बांधकामे किंवा भूखंड नियमित करून घेण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार नांदेड वाघाळा महापालिकेत गुंठेवारी विकास योजना ही ता. २१ सष्टेंबर २०२१ रोजी सुरू केली होती. त्यानंतर गुंठेवारी योजनेसाठी सहा वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यातून २० हजार १५२ संचिका दाखल झाल्या होत्या. त्यापैकी नऊ हजार ८७० संचिका निकाली निघाल्या आहेत.
उर्वरित काही संचिका त्रुटीत तर काही काही निकाली काढण्यात आल्या आहेत. त्यातून महापालिकेला जवळपास ५५ रुपये कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. ता. ३० जून २०२३ रोजी गुंठेवारी बंद करण्यात आली होती. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात बनावट स्वाक्षऱ्या करून झालेला गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे सहा महिने ता. ३१ डिसेंबरपर्यंत गुंठेवारी कक्ष बंद ठेवण्यात आला होता.
दरम्यान, नागरिकांच्या मागणीस्तव नव्याने आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आणि अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी नुकतीच बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर ता. ३१ जानेवारीपर्यंत गुंठेवारी विकास योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ता. एक जानेवारीपासून गुंठेवारी योजना सुरू करण्यात आली असून गेल्या आठवडाभरात ३५० प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.
महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहकार्याने गुंठेवारी विकास योजनेतून नागरिकांना आपली बांधकामे, भुखंड सक्षम प्राधिकरणाच्या माध्यमातून नियमित करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. त्यासाठी महापालिकेत विशेष कक्ष सुरू करण्यात आला असून त्यात एक सहायक आयुक्त, तीन उपअभियंता, चार कनिष्ठ अभियंता आणि सात रोड कारकून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी गुंठेवारीच्या संचिका ता. ३१ जानेवारीपर्यंत दाखल कराव्यात.
- गिरीश कदम,
अतिरिक्त आयुक्त
गुंठेवारी विकास योजना सुरू : २१ सष्टेंबर २०२१
आत्तापर्यंत मुदतवाढ : सहा वेळा
दाखल संचिका : २०,१५२
निकाली संचिका : ९,५००
प्रशमन शुल्क : ५५ कोटी
नव्याने मुदतवाढ : ३१ जानेवारी
आत्तापर्यंत संचिका दाखल : ३५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.