Nanded politics : काँग्रेसला गळती, भाजपमध्ये भरती ; विरोधी पक्ष अजूनही संभ्रमावस्थेमध्ये

कधी काळी कॉँग्रेसचा गड असलेला नांदेड जिल्हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे कोसळला आहे. जिल्ह्यात कॉँग्रेसमध्ये गळती सुरूच आहे. चव्हाण यांचे समर्थक, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याने भविष्यात नांदेड जिल्हा ‘भाजप’मय होणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
Nanded politics
Nanded politicssakal
Updated on

नांदेड : कधी काळी कॉँग्रेसचा गड असलेला नांदेड जिल्हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे कोसळला आहे. जिल्ह्यात कॉँग्रेसमध्ये गळती सुरूच आहे. चव्हाण यांचे समर्थक, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याने भविष्यात नांदेड जिल्हा ‘भाजप’मय होणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडी झाल्याने कॉँग्रेससोबतच इतर विरोधी पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते अजूनही संभ्रमास्थेत आहेत. महाआघाडी आणि महायुतीतील घटक पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

गेल्या २०-२२ वर्षांत नांदेड जिल्हा आणि कॉँग्रेस असे घट्ट समीकरण तयार करण्यात अशोक चव्हाण बऱ्यापैकी यशस्वी झाले होते. २०१४ च्या मोदी लाटेतही ते खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, २०१९ मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भोकरमधून पुन्हा आमदार होत त्यांनी महाविकास आघाडीत सार्वजनिक बांधकाममंत्रीपदही मिळवले. अडीच वर्षांनंतर महाआघाडीत फूट पडली आणि महायुतीचे सरकार सत्तेत आले.

दरम्यानच्या काळात गेल्या दीड वर्षापासून अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि अखेर ते भाजपमध्ये दाखल झाले. या पक्षातर्फे लगेचच त्यांची राज्यसभेवर निवड झाली. त्यांच्योसबत डॉ. अजित गोपछडे हेही राज्यसभेचे सदस्य झाल्याने जिल्ह्याला खासदारकीची लॉटरी लागली.

खासदार झाल्यानंतर अशोक चव्हाण नांदेडला परतले, तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले. त्या दिवसापासून आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रांगच लागली. जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतले. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा भाजपमय करण्याची जबाबदारी चव्हाण यांच्यावर येऊन पडली आहे. त्यादृष्टीने तेही कामाला लागले आहेत. नांदेडसोबतच मराठवाड्यातील इतर जिल्हे तसेच राज्याचीही त्यांच्यावर जबाबदारी राहणार असल्याचे सध्याच्या वातावरणावरून दिसून येत आहे.

Nanded politics
Nanded News : पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांचा मराठी पत्रकार संघटनेतर्फे निषेध

‘वंचित’, ‘एमआयएम’ची भूमिका महत्त्वाची

लोकसभच्या नांदेड मतदारसंघत वंचित बहुजन आघाडीने गेल्यावेळी एक लाख ६६ हजार एवढी लक्षणीय मते घेतल्यामुळे पुन्हा एकदा वंचितकडून उमेदवार राहणार, हे नक्की. पण, कोण असेल हे गुलदस्त्यात आहे. वंचितकडून ॲड. प्रकाश आंबेडकर हेही रिंगणात उतरू शकतात. कारण त्यांनी यापूर्वीही नांदेडची निवडणूक लढवली आहे. वंचितचे राज्य प्रवक्ते फारूख अहेमद यांचेही नाव चर्चेत आहे. त्याचबरोबर एमआयएम पक्ष, बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांकडूनही निवडणूक कोण कोण लढविणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणूक निकाल (२०१९)

  • प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) : चार लाख ८६ हजार ८०६

  • अशोक शंकरराव चव्हाण (काँग्रेस) : चार लाख ४६ हजार ६५८

  • प्रा. यशपाल नरसिंगराव भिंगे (वंचित) : एक लाख ६६ हजार १९६

  • (चिखलीकर ४० हजार १४८ मतांनी विजयी)

कॉँग्रेस उमेदवाराच्या शोधात

कॉँग्रेसमध्ये अजूनही गळती सुरूच असून अनेकजण अशोक चव्हाण यांच्यासोबत जात आहेत. ज्या विधानसभा मतदारसंघात किंवा तालुक्यात आधीच भाजप मजबूत आहे, तेथील कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. कॉँग्रेसमधील आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहन हंबर्डे आणि आमदार जितेश अंतापूरकर हे अजूनही कॉँग्रेसमध्येच आहेत. त्याचबरोबर माजी आमदार वसंत चव्हाण, हणमंत पाटील बेटमोगरेकर यांनीही कॉँग्रेसची साथ सोडलेली नाही. कॉँग्रेसकडून सध्या लोकसभेसाठी उमेदवार कोण, याची चाचपणी सुरू असून त्यामध्ये वसंत चव्हाण, बी.आर. कदम, आशाताई शिंदे आदींची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीकडूनही माजी मंत्री कमलकिशोर कदम यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेना (उबाठा) गटाकडून माजी खासदार सुभाष वानखेडे यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे.

Nanded politics
Nanded News : पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांचा मराठी पत्रकार संघटनेतर्फे निषेध

भाजपकडून इच्छुकांची चाचपणी

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे पक्ष निरीक्षक म्हणून माजी मंत्री सुभाष देशमुख, आमदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर, डॉ. मीनल पाटील खतगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, डॉ. संतुक हंबर्डे यांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. यामध्ये इच्छुकांची संख्याही मोठी आहे. जिल्ह्यातील बदललेली समीकरणे लक्षात घेता पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात, ते महत्त्वाचे आहे.

घटक पक्षांची भूमिका महत्त्वाची

जिल्ह्यात सध्या कॉँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना असला, तरी घटक पक्षांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. महाआघाडीतर्फे कॉँग्रेसने दावा केला असून, त्यांच्यासोबत शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार) या दोन पक्षांचीही साथ आहे. त्याचबरोबर भाजपसोबत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार), रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) असून त्यांचीही भूमिका छोटे असले, तरी महत्त्वाची आहे. घटक पक्षांचे जिल्ह्यातील काही तालुक्यांत, गावांत बऱ्यापैकी अस्तित्व आहे. त्यामुळे या सगळ्यांना सोबत घेऊन काम करताना समन्वय ठेवावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.