नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

नांदेड - गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्प
नांदेड - गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्प
Updated on

नांदेड - गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात जुलैच्या पहिल्या पंधरवड्यातच चांगली वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. नऊ) ५८.५६ दलघमी म्हणजेच ७२.४८ टक्के पाणीसाठा विष्णुपुरी प्रकल्पात झाला आहे. त्यामुळे नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. 

नांदेड शहराचे क्षेत्रफळ ६५ चौरस किलोमीटर आहे तर नांदेड शहराची लोकसंख्या २०२० मध्ये अंदाजे आठ लाख ४५ हजार आहे. त्यामध्ये महापालिका हद्दीसह वाडी बुद्रुक, मेडीकल कॉलेज, श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी कॉलेज, गुरूद्वारा, गोपाळचावडी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचाही समावेश आहे. त्यामुळे या भागात पाणीपुरवठा करण्यात येतो. नांदेड शहरासह एमआयडीसी आणि आजूबाजूच्या खेड्यांना विष्णुपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. गेल्या आठवड्यात परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे ओढे, नदी नाल्यांना पाणी आले. ते पाणी विष्णुपुरी प्रकल्पात आल्यामुळे साठा वाढल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली. 

सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा
नांदेड शहराला सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. विष्णुपुरी प्रकल्पातील ३६ दलघमी तर ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील (इसापूर) सहा दलघमी पाणीसाठा महापालिकेने आरक्षित केला आहे. दरडोई दरदिवशी ११५ लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी विष्णुपुरी प्रकल्प आणि सांगवीतील बंधाऱ्यातून दररोज शंभर दशलक्ष लिटर पाणी वापरले जाते. 

शहरासाठी पाच जलशुद्धीकरण केंद्र
नांदेड शहरासाठी काबरानगर येथील दोन, डंकीन येथील नवीन पंप हाऊस; तसेच असदवन आणि सिडको अशा पाच ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र आहेत. या जलशुद्धीकरण केंद्रातून ३६ जलकुंभात पाणी आणून ते शहराला नळाद्वारे पुरविले जाते. काबरानगर येथील दोन जलशुद्धीकरण केंद्रावरून २३ जलकुंभाला पाणीपुरवठा होतो. डंकीनवरुन तीन जलकुंभाला, असदवन येथून आठ जलकुंभाला तर सिडकोतून दोन जलकुंभाला पाणीपुरवठा करण्यात येतो. 

विंधनविहिरी, हातपंपाद्वारेही पाणीपुरवठा
महापालिकेचे दहा टॅंकरही पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध आहेत. महापालिका हद्दीत एकूण २५९ पॉवरपंप (विंधन विहिरी) असून त्याद्वारे प्रतिदिन आठ लाख लिटर पाणीपुरवठा होतो. त्याचबरोबर ७५४ हातपंप असून त्याद्वारे प्रतिदिन सहा लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. 
 

 

यंदा समाधानकारक परिस्थिती
विष्णुपुरी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला असून सध्या महापालिकेतर्फे दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक परिस्थिती असली तरी नागरिकांनीही पाणी जपून वापरावे, अपव्यय टाळावा. 
- सुग्रीव अंधारे, कार्यकारी अभियंता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.