Nanded News : नंदीबैलच उदरनिर्वाहाचे साधन; धर्मराज नंदीवाले यांनी जपली परंपरा, नवीन पिढी अनुत्सुक

लोकसंस्कृतीचे निखळत चाललेले घटक आजही गावोगाव भटकंती करताना दिसत आहेत. भटके फिरस्ते दरवर्षी सुगीच्या हंगामात गल्लोगल्ली गावोगाव फिरस्ती करतात.
Dharmraj Nandiwale
Dharmraj Nandiwalesakal
Updated on

नांदेड - लोकसंस्कृतीचे निखळत चाललेले घटक आजही गावोगाव भटकंती करताना दिसत आहेत. भटके फिरस्ते दरवर्षी सुगीच्या हंगामात गल्लोगल्ली गावोगाव फिरस्ती करतात. त्यातीलच एक आहेत अक्कलकोट येथील धर्मराज नंदीवाले.

गोल गोल चामड्याला,

दांडकं हे घासतंय,

बघ बघ सखे कसं,

गुबूगुबू वाजतंय....

या लोकगीताची आठवण होईल, असे बोल वाजवित अक्कलकोट (जि. सोलापूर) येथील धर्मराज नंदीवाले व त्यांचे सहकारी हे फिरस्ते गावोगाव हजेरी लावतात. गुरुवारी (ता. २३) धर्मराज व त्यांचे सहकारी नंदीबैल घेऊन नांदेड शहरात फिरत होते. गुरुद्वाराच्या दर्शनासाठी आम्ही येतो. दिवसभर नांदेड शहरात फिरून माहूरच्या श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी जातो, असे धर्मराज यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, पूर्वीच्या काळात करमणूकीची साधने खूप कमी होती. त्यावेळी लोकांचे मनोरंजन करणारे हे फिरस्ते हवे हवेशे वाटत. काळ बदलला, बदलत्या काळाबरोबर करमणुकीची साधने बदलली. रेडिओ, टीव्ही आला, टेपरेकॉर्डर वाजू लागले, पडद्यावर चित्रपट आले आणि आता तर मोबाईल आला आणि लोकसंस्कृतीचा हा मुख्य घटक हद्दपार होतोय, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सुगीच्या हंगामापासून माघ महिन्यापर्यंत आम्ही गावोगाव फिरतो. नंदीबैलाला खायला देवून आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आजही आहे. परंतु, बदलत्या काळानुरुप आमचा हा व्यवसाय आज संकटात सापडला आहे. केवळ नंदीबैल सोबत घेऊन आम्ही आमचा उदरनिर्वाह करत असल्याचेही धर्मराज नंदीवाले यांनी सांगितले.

पूर्वी नंदीबैलाला होते मानाचे स्थान

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?,

शाळेभोवती तळे साचून, सुट्टी मिळेल काय...?

या बालगीताची आठवण नंदीबैल बघून निश्चितच होते. नंदी बैलाला कोणाताही प्रश्‍न विचारला तरी तो मान डोलवून होय किंवा नाही अशी साचेबद्ध उत्तरे देतो. नंदी तुळजाभवानीचा आहे का? असे विचारल्यावर नाही नाही... असे मानेने सांगतो. नंदी गणपतीचा काय? म्हटल्यावर नकारार्थी मान हलवतो. नंदी महादेवाचा काय? असे विचारताच होकार देतो. पुर्वी या खेळाला गल्लीत मानाचे स्थान होते.

परंपरागत नंदी बैल व्यवसाय पूर्वीप्रमाणे राहिला नाही. भविष्य ऐकणारी पूर्वीची पिढी आता राहिली नाही. धान्य पूर्वीप्रमाणे जमत नाही. सुया, पिना, दातवण व्यवसाय तर बंदच झाला आहे. नवीन पिढीतील मुले या व्यवसायात येण्यास तयार नाहीत.

- धर्मराज नंदीवाले, अक्कलकोट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.