Donation of Life : बॅंक अधिकाऱ्याचे अवयवदान; चौघांना जीवनदान; एकाला मिळणार दृष्टी

अपघातात गंभीर जखमी एका बँक अधिकाऱ्याचे ब्रेनडेड झाले. त्यांच्या पत्नीने अवयवदानाचा निर्णय घेतला.
Abhijit Dhoke
Abhijit Dhokesakal
Updated on

नांदेड - अपघातात गंभीर जखमी एका बँक अधिकाऱ्याचे ब्रेनडेड झाले. त्यांच्या पत्नीने अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर बुधवारी (ता.३) नांदेड शहरातील ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले. यकृत, हृदय विमानाने तर, दोन किडण्या छत्रपती संभाजीनगर येथे रस्ते मार्गाने पाठविण्यात आल्या. दोन डोळे हे नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला दान करण्यात आले.

बँक अधिकारी अभिजित अशोक ढोके (वय ३७) यांच्या अवयवदानामुळे चौघांना जीवनदान तर एकास दृष्टी मिळाली आहे.

नांदेडमध्ये झालेले हे सहावे ग्रीन कॉरिडॉर होते. ते यशस्वी झाले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माळाकोळी (ता.लोहा) येथील शाखेत अभिजित ढोके हे सहायक व्यवस्थापक पदावर होते. अभिजित ढोके आणि बँकेतील इतर कर्मचारी २९ जूनला कारने माळाकोळी येथील हिराबोरी ते लांडगेवाडी मार्गावरून जात होते. यावेळी कारचा भीषण अपघात झाला.

अपघातात मध्यवर्ती बँकेत रोखपाल पदावर कार्यरत असणारे सुनील बगाडे यांचा जागीच मृत्यू झाला तर अभिजित ढोके आणि शादूल शेख गंभीर जखमी झाले होते. अन्य एक जण किरकोळ जखमी होता. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अभिजित ढोके यांच्यावर यशोसाई हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून उपचार सुरू होते.

त्यानंतर गेल्या मंगळवारी त्यांना आयटीआय परिसरातील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांचे ब्रेनडेड झाल्याची माहिती डॉक्टरांनी ढोके यांच्या नातेवाइकांना दिली. अभिजित ढोके यांचे अवयव दान करण्याचा निर्णय त्यांच्या पत्नी प्रिया यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाचा कुटुंबीयांतील सदस्यांनी सहमती दिली. त्यानंतर आज दुपारी बारा ते सव्वादोनच्या दरम्यान ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले.

अभिजित यांचे मूळगाव पेनूर (ता. लोहा) असून ते नांदेडला वास्तव्याला होते. त्यांच्या मागे आई नंदा, मोठे बंधू अशोक ढोके (जिल्हा परिषदेच्या नागापूर (जि. नांदेड) येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक), बंधू अक्षय, बहीण अपेक्षा प्रवीण गाडे, पत्नी प्रिया, मुलगा अन्वेष (वय ५) असा परिवार आहे.

रात्री उशिरापर्यत प्रत्यारोपण

छत्रपती संभाजीनगर - नांदेड येथील ब्रेनडेड रुग्णाचे हृदय आणि लिव्हर विमानाने शहरात आले. विमानतळावरून बायपासवरील कमलनयन बजाज रुग्णालयात ते पाठवण्यात आले. सायंकाळी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू झाली. रुग्णवाहिकेद्वारे सायंकाळी आलेल्या दोन किडन्या शहरात आल्या. एमजीएम रुग्णालयातील ४२ वर्षीय आणि मेडिकव्हर हाॅस्पिटलमधील ६३ वर्षीय रुग्णावर किडनी प्रत्यारोपणाचे नियोजन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत प्रत्यारोपणाची प्रकिया सुरू होती.

लहानपणापासून माझा भाऊ इतरांना देणारा होता. अपघाताने ब्रेनडेडमुळे त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय त्याच्या पत्नीने घेतला. त्यामुळे चौघांना जीवदान तर एकाला दृष्टी मिळणार आहे. या लोकांचे आशीर्वाद अभिजितच्या कुटुंबीयांना मिळतील. आपल्यात संवेदनशीलता जागृत असली पाहिजे. हा क्षण दु:खाचा असला तरी, आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो, ही भावना महत्त्वाची असते. माझा भाऊ इतरांसाठी जगला आणि इतरांसाठी गेला.

- अक्षय ढोके, अभिजित यांचे मोठे बंधू

पाच मिनिटांत तीन किलोमीटर पार

छत्रपती संभाजीनगर येथून डॉक्टरांची दोन पथके पहाटे येथे दाखल झाली. अवयवदानाची प्रक्रिया चार तासांत पूर्ण करण्यात आली. यकृत, हृदय छत्रपती संभाजीनगर येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये विमानाने पाठवण्यात आले. डोळे नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

एक किडनी छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम व दुसरी किडनी मेडिकव्हर हॉस्पिटल येथील रुग्णास दान करण्यात आली. ग्रीन कॉरिडॉरमुळे ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळ हे तीन किलोमीटरचे अंतर केवळ पाच मिनिटांत पार करण्यात आले. अभिजित यांच्यामुळे चौघांना जीवदान, एकास दृष्टी मिळाल्याचे डॉ. त्रिंबक दापकेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.