तामसा, (ता.हदगाव, जि. नांदेड) ः तामसा भागातील अनेक गावांच्या शेतशिवारात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवत नसल्याचे अनेक प्रकार उघड होत असून शेतकऱ्यांनी उगवण क्षमता नसणाऱ्या सोयाबीन बियाणांच्या शेतात दुबार पेरणीसाठी नांगर फिरवण्यास सुरवात केली आहे. घरगुती तसेच कंपनी सोयाबीन बियाणेबाबत असे प्रकार होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून पेरणी करून सोयाबीन बियाणे उगवत नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे खरीप हंगामाच्या सुरवातीलाच मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकरी हवालदिल
खरीप हंगामात मृग नक्षत्रात पावसाने एक ते दोन वेळेस हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. सोयाबीन बियाणांच्या खरेदीवर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला असून घरगुती बियाण्यांचा या वेळेस कृषी विभागाच्या आवाहनानुसार पेरण्यासाठी मोठा वापर झाला. पण पेरण्या होऊन दोन-तीन दिवसांत पावसाने पाठ फिरवल्यामुळे सोयाबीन अंकुरण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून पेरलेले बियाणे उगवत नसल्याचा धक्का शेतकऱ्यांना बसत आहे. पुरेश्या व समाधानकारक पावसाअभावी पेरलेले सोयाबीन बियाणे जमिनीत खराब होत असून त्याची उगवण क्षमता लोपत आहे. पेरलेले सोयाबीन बियाणे कुजणे, वाळून जाणे असे प्रकार वाढल्यामुळे बियाणांची उगवण क्षमता संपल्यामुळे संबंधित शेतकरी हवालदिल झाले आहेत.
बियाणेदेखील उगवत नसल्याचे प्रकार
या वर्षी खरीप हंगामाच्या सुरवातीलाच निसर्गाची अवकृपा, सोयाबीन बियाणाच्या बाबतीत होण्याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसणार आहे. घरगुती बियाणासोबतच विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणेदेखील उगवत नसण्याचे प्रकार कोळगाव, येवली, तामसा, चिकाळा, राजवाडी, ब्रह्मवाडी, उमरी जहागीर, कंजारा, एकराळा, पांगरी, दिग्रस, लोहा, शिवपुरी आदी गावांच्या शेतशिवारात स्पष्ट होत आहेत. या दुर्देवी व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणाऱ्या प्रकारानंतर शासनाने संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याची मागणी पुढे येत आहे. एकाच कंपनीची दोन दुकानांतून खरेदी केलेल्या सोयाबीन बियाण्यांचे उगवण्याबाबतचे निकाल परस्पर विरोधी येण्याचे प्रकारही शेतकऱ्यांच्या चर्चेत आहेत. यामुळे सोयाबीनचे बोगस बियाणे विक्रीची भीती व्यक्त होत असून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा सूरही ऐकू येत आहे.
शेतात सोयाबीन बियाणे पेरून आठवडा झाला, पण अद्यापही अंकुरले नाही. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीन बियाणांच्या २७ बॅग शेतात पेरल्या होत्या. पेरणीनंतर आवश्यक असणारा पाऊस न होणे व बियांणामध्ये उगवणक्षमता नसणे किंवा बोगस बियाणे असण्यामुळे माझ्या चुलत भावाला हंगामाच्या सुरवातीलाच अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
- शेषराव वाकोडे, शेतकरी, येवली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.