नांदेड : जगतज्योती महात्मा बसवेश्वर हे सामाजिक एकोप्याचे प्रतिक होते. त्यांची दृष्टी व्यापक होती. त्यांच्या नांदेड येथे होणाऱ्या अश्वारूढ पुतळ्याकडे पाहून आपणास एक वेगळीच उर्जा सदैव मिळत राहणार आहे. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे उद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी काढले.
नवीन कौठा भागातील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या भूमीपुजन सोहळाप्रसंगी ते बोलत होते.
नामदार चव्हाण पुढे म्हणाले की, जगतज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळ्याचा कामाचा शुभारंभ ता. १५ ऑगस्ट या ऐतिहासिक दिवशी करण्याचा योग आला आहे. पुतळ्या संदर्भात विविध सामाजिक संघटनांनी मागणी केली होती. पुतळा बसविण्यासाठी थोडा वेळ लागला. या कामासाठी विविध सामाजिक संघटनांनी पाठपुरावा केला. त्याबद्दल त्यांचे आभार मानत शेवट मात्र गोड झाला आहे असे त्यांनी सांगितले. आजचा हा सोहळा सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. याचे मला मनस्वी समाधान आहे. नांदेड शहरामध्ये यापूर्वी अनेक राष्ट्रपुरूषांचे व महात्म्यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये आता जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची भर पडणारी आहे. जगतज्योती महात्मा बसवेश्वर समतेचे पुजारी होते. त्यांचा पुतळा सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणार आहे. या पुतळ्याचे आज भूमीपुजन झाले असून लवकरच तयार होणाऱ्या या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा भिमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी केदार जगतगुरू, राष्ट्रसंत डॉ. शिवलींग शिवाचार्य महाराज व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
लवकरच न्यायालयाची इमारत तयार करु
नवीन कौठा परिसरात न्यायालयाची २५० कोटी रूपयांची भव्य वास्तू लवकरच उभारणार असून याच भागात सर्व कार्यालयांना एकत्रीत आणण्यासाठी प्रशासकीय इमारती उभ्या करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
यावेळी बोलतांना आमदार अमरनाथ राजूरकर म्हणाले की, महात्मा बसेवश्वरांच्या पुतळा उभारणीमध्ये भाजपने मोठे राजकारण केले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये लिंगायत समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु काँग्रेस पक्ष हा सर्वांना समान न्याय देणारा असून जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा नांदेडमध्ये बसविण्याचे अभिवचन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात दिले होते. ते वचन आज अशोकराव चव्हाण यांनी पुर्ण केले आहे.
दक्षिण मतदार संघासाठी गौरवास्पद बाब
यावेळी आमदार मोहन हंबर्डे यांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात होणारा हा पुतळा आमच्यासाठी अभिमानाची व गौरवशाली बाब असल्याचे सांगीतले. तर माजी सभापती किशोर स्वामी यांनी आपल्या भाषणामध्ये पुतळ्याचा इतिहास सांगताना लिंगायत समाज हा नेहमीच पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षाच्या पाठिशी भक्कमपणे उभा असून येणाऱ्या काळात या समाजाला विधीमंडळात प्रतिनिधीत्व द्यावे अशी मागणी त्यांनी केली. मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी पुतळा निर्मितीची प्रशासकीय बाजू आपल्या भाषणातून सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार संतोष पांडागळे यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार इश्वरराव भोसीकर, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षा धबाले, शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, माजी महापौर शैलजा स्वामी, माजी सभापती किशोर स्वामी, भाजपाचे प्रकाश कौडगे, बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अविनाश भोसीकर, माजी सभापती माधवराव पांडागळे, उपमहापौर सतीश देशमुख, सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, जि.प.चे सभापती संजय बेळगे, माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, अनिल पाटील खानापूरकर, सुनिल शेट्टे, दिलीप डांगे, वैजनाथ देशमुख, राजु शेटे, बाबूराव सायाळकर, बालाजी पांडागळे, दिपाली मोरे, राजू काळे, संजय मोरे, शांताबाई गोरे, सुभाषअप्पा सराफ, संतोष मोरे, उमेश पवळे, सचिन टाले, विजय होकर्णे, विश्वनाथ देशमुख, लक्ष्मीकांत गोणे, सतीश राखेवार, आर्टिटेक्टचर अनिल माळगे, ठेकेदार नागेश शेट्टी आदिंची उपस्थिती होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.