नांदेड - शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर सोमवारी (ता. ११) पावसाचा जोर ओसरला आहे. गेल्या २४ तासात सरासरी ७.४० मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. आठ) आणि शनिवारी (ता. नऊ) झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार जवळपास २२ हजार हेक्टरला फटका बसला आहे.
दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले असून नद्या, नाल्यांनाही पाणी आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. काही ठिकाणी शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. जिल्ह्यात नांदेड, बिलोली, लोहा, भोकर, मुदखेड, हिमायतनगर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर आणि नायगाव तालुक्यात जास्त फटका बसला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. रविवारी (ता. दहा) थोड्या फार प्रमाणात पाऊस झाला तर सोमवारी (ता. ११) पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे.
दरम्यान, नुकसान झालेल्या शेती आणि पिकांची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, नायगावचे आमदार राजेश पवार, लोहा कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी यांनी पाहणी केली आहे. जिल्ह्यातील जवळपास ३० हजार शेतकऱ्यांनी पिकविमा भरला आहे. त्यातील ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्यांनी ७२ तासाच्या आत ई - मेल, ॲप अथवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करून पिकविमा कंपनीला पूर्वसूचना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुकानिहाय पाऊस
जिल्ह्यात सोमवारी (ता. ११) सकाळी सव्वा आठ वाजेपर्यंत संपलेल्या गत २४ तासात सरासरी ७.४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण ३६६.३० मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी संपलेल्या गत २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी ता. एक जूनपासून आत्तापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आहे. नांदेड - ०.९० (३८४.८०), बिलोली - ४०.५० (३७०.३०), मुखेड - ४.४० (३८६.४०), कंधार - दोन (४२८.६०), लोहा - २.८० (३६५.८०), हदगाव - १.६० (२७५.४०), भोकर - ४.५० (३३६.१०), देगलूर - ५.२० (३८१.), किनवट - ११.३० (३६१.४०), मुदखेड - चार (४६८.२०), हिमायतनगर - १३.२० (४५२.७०), माहूर - ७.३० (२८२.९०), धर्माबाद - नऊ (३३९), उमरी - आठ (४१५.५०), अर्धापूर - ०.९० (३५८), नायगाव - ४.८० (२९७.३०).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.