मुदखेड ( जिल्हा नांदेड ) : जिल्ह्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी एक योजना आखली असून ती योजना लवकरच अंमलात आणली जाणार आहे. मात्र या योजनेला महुसलचेच काही झारीतील शुक्राचार्य हरताळ फासतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. गंगाबेट आणि मार्कंड येथे जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांनी केलेल्या कारवाईमुळे वाळू माफिया सावध होतील असे वाटले असतानाच पुन्हा त्यांनी मुदखेड तालुक्यात धुमाकुळ घातला आहे. मुदखेड तालुक्यात वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असून याकडे मात्र प्रशासनाचे सोपस्कर दुर्लक्ष होत असून नावालाच महिनाभरातून एखादेवेळी महसूल प्रशासन कारवाई करुन आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करीत आहे.
मागील दोन- अडीच महिन्यापासून कोरोना काळामुळे वाळू माफियांचे मोठे फावले आहे. या काळात वाळूमाफियांनी आपला मोर्चा मुदखेड तालुक्यातील गोदावरीच्या घाटांवर वळवला आहे. मुदखेड तालुक्यातील आमदुरा, वासरी, शंखतीर्थ, ब्राह्मणवाडा, खुजडा, टाकळी व चिलपिंपरी या भागांमध्ये सक्शन पंपाच्या सहाय्याने रात्रंदिवस वाळू उपसा मोठ्या प्रमाणात चालू असून या वाळू माफियांना महसूल विभागातील कोणत्या अधिकार्यांचे तर जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ मिळत आहे हा विषय मात्र संशोधनाचा बनलेला आहे.
हेही वाचा - राज्यभरातील ७५०० शिकाऊ एमबीबीएस डॉक्टर आंदोलनात सहभागी होणार आहेत.
लाकडाऊनच्या काळामध्ये मागील दोन महिन्यापासून मुदखेड तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरु असून या बांधकामांना वाळू तस्करांकडून वाळूचा पुरवठा केला जात आहे. सध्याला तीन ब्रास वाळूची गाडी १८ ते २२ हजार रुपये या दराने विक्री होत आहे त्यामुळे वाळूतस्करांनी मात्र आपले उखळ पांढरे करुन घेतले आहे.
गोदावरी नदीच्या तीरावर असलेल्या आमदुरा, वासरी, चिलपिंपरी, शंखतीर्थ, कांबळज, खुजडा, टाकळी, ब्राह्मणवाडा या भागातून राजरोसपणे दररोज मुदखेड मार्गे शेकडो वाळूच्या गाड्या जात असून या गाड्यांवरती व या वाळूतस्करी वरती प्रशासनाचा कुठलाच अंकुश दिसत नाही. प्रशासन मात्र महीन्यातून एक ते दोन वेळा आपली कारवाई गोदावरीच्या पात्रात सक्शन पंप जिलेटिन च्या द्वारे उडवून देऊन कायदेशीर कारवाई व प्रक्रिया पूर्ण करतात मात्र हे उडवून दिलेल्या सक्शन पंपाचे अवशेष जप्त करण्याची तसदी मात्र प्रशासन घेत नाही. जर हे सक्शन पंप जप्ती केले तर या सक्षम पंपाचे मालक कोण आहेत याचा शोध पोलिस प्रशासन लावू शकते व संबंधित तस्करांवर ती कार्यवाही देखील होऊ शकते, परंतु महसूल प्रशासन अशा या कारवायांना पुढे का जात नाही? हा प्रश्न देखील अनुत्तरित आहे.
मागील अनेक दिवसापासून गोदावरी गंगा प्रेमीकडून सतत मागणी होत असते की सदरील सक्शन पंप हे जिलेटिनद्वारे पाण्यामध्ये उडवून देऊ नये हे सक्शन पंप पाण्यातून बाहेर काढून उडवून द्यावे किंवा जप्त करावे अशी मागणी होत असते कारण गोदावरीच्या पात्रांमध्ये असलेल्या पाण्यात जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात असून या सक्षन पंपामध्ये असलेले ऑइल, डिझेल व जिलेटिन कांड्या द्वारे उडवून देण्यात आल्याने होणारा विषारी वायु पाण्यात पसरुन या पाण्यात असलेले जलचर प्राणी मृत्यू पावत आहेत या प्राण्यांच्या मृत्यू व गोदावरी नदीच्या पात्रातील दूषित होत असलेले पाणी यास जबाबदार कोण? असा प्रश्न गोदावरी गंगा प्रेमीकडून होत आहे.
रविवारी (ता. ३०) पहाटे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे व तहसीलदार दिनेश झाम्पले यांच्या पथकास वासरी येथे गोदावरी नदी पात्रात अवैध वाळु उपसा करणारे सक्शन पंप ( वाळू उपसा करणारी बोट ) चालू असल्याची माहिती मिळताच पथकाने सक्शन पंप उध्दवस्त करण्याची कारवाई केली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार दिनेश झाम्पले,नायब तहसीलदार संजय नागमवाड यांचे पथक वासरी पोहोचले असता, वासरी हद्दीतील गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर अवैध उत्खनन करणारी सक्शन पंप बोट आढळून आली. लगेच सदर ठिकाणी परवानाधारक जिलेटीनचा वापर करणाऱ्या व्यक्तीस बोलावून घेऊन स्फोट करवून बोट आहे त्या ठिकाणीच नष्ट करण्याची कारवाई केली गेली. तसेच सदर वाळू उत्खनन करणारे पाच व्यक्तीना ताब्यात घेऊन मुदखेड पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.