संचारबंदी... वाळू माफियांची मात्र चांदी

valu trak.jpg
valu trak.jpg
Updated on


धर्माबाद, (जि. नांदेड) ः सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य लॉकडाउन करून संचारबंदी लागू केल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. तरी कोरोनाची साथ वाळू माफियांच्या चांगलीच पथ्यावर पडल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या लॉकडाउनच्या संधीचे सोनं करण्यासाठी वाळू माफियांनी मध्यरात्रीनंतर सर्रास वाळू चोरी करून विकण्याचा सपाटा लावला आहे. पोलिस, महसूलचे अधिकारी दिवसभर लॉकडाउनच्या ड्युट्या करीत असले तरी, वाळू माफियांकडे त्यांचे ‘अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्यानेच बिनधास्त वाळू चोरी करण्याची हिम्मत होत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. 


ट्रॅक्टरला पकडून महसूलच्या ताब्यात
‘सकाळ’मध्ये अवैध वाळूसंदर्भात मालिका प्रकाशीत केली आहे. या बातम्यांची दखल घेऊन गुरुवारी (ता.सात) रात्री ‘एलसीबी’च्या पथकाने अवैध वाळू वाहतुकीचा टिप्पर ग्रीन फिल्ड शाळेजवळ पकडला. व कारवाईसाठी महसूलच्या ताब्यात दिला. महसूल विभाग तर म्हणते सध्या अवैध वाळू वाहतूकच नाही, मग ‘एलसीबी’ची केलेली ही कारवाई कुठली? हे विशेष. या अवैध वाळू वाहतुकीला कंटाळून काही दिवसांखाली शंकरगंज येथील नागरिक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडून महसूलच्या ताब्यात दिले होते. तर याच आठवड्यात सोमवारी तालुक्यातील संगम येथील वाळू साठ्यावर तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी जवळपास ४० ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती. तरीपण अजूनही टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक जोमाने सुरू आहे. यावरून वाळू माफियांची हिम्मत किती वाढली आहे हेच दिसून येते. संगम येथील वाळू साठा जप्त केलेली कारवाई ही केवळ नौटंकी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.


आशीर्वादाशिवाय शक्य नाही
अवैध वाळू वाहतुकीची मालिका ‘सकाळ’ने प्रकाशीत केल्यानंतर गुरुवारी रात्री ग्रीन फिल्ड शाळेजवळ ‘एलसीबी’च्या पथकाने सापळा रचून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारा टिप्पर (क्र. एपी २९ टीए ३९८४) ताब्यात घेतला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी महसूल विभागाशी संपर्क करण्यात आला आहे. या वेळी टिप्परच्या किमतीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महसूल विभागातील कर्मचारी तर म्हणतात की, सध्या अवैध वाळू वाहतूकच नाही. मग एलसीबीची केलेली ही कारवाई कुठली? ही वाळू कुठून आली? हा प्रश्न उपस्थित होत आहे. संगम, हुनगुंदा नदीपात्रातून व गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणे हे कोणाच्या तरी आशीर्वादाशिवाय शक्य नाही. अवैध वाळू वाहतुकीला संबंधित यंत्रणेकडून आळा घातला जात नाही. हे कशाचे द्योतक म्हणावे? त्यामुळे अवैध वाळू वाहतुकी संबंधात कितीही ओरड होत असली तरी त्याची दखल घेणार कोण ? हा खरा प्रश्न असून तो अनुत्तरीत आहे.


या ठिकाणांवरून होतय अवैध वाळू वाहतूक 
धर्माबाद तालुक्यातील संगम, मनूर, नेरली, बामणी, विळेगाव (थडी), मोकली, सिरसखोड या रस्त्यावरून सिरसखोड कॉर्नर, ग्रीन फिल्ड शाळेजवळून बाळापूर मार्ग धर्माबाद शहरात व ग्रीन फिल्ड शाळेजवळून महाराष्ट्र बसस्थानक, शंकरगंज, रत्नाळी, रेल्वेगेट नंबर दोन, फुलेनगरसह शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.