फुलवळ (नांदेड) : आज जागतिक महिला दिन त्यानिमित्ताने इतरांपेक्षा आपल्यातील वेगळपण दाखवत स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव होणे आणि आपण तो करणे तेवढेच महत्त्वाचे असते, म्हणूनच आज एका अशा कुटुंबातील महिलेने स्वकर्तृत्वावर आपली वेगळी ओळख निर्माण केली त्यांच्याबद्दल जाणून घेऊ.
कंधार तालुक्यातील फुलवळ येथे जन्म घेतलेल्या वंदना गंगाधर मंगनाळे या अगदी लहान वयात असतानाच डोक्यावरच वडिलांचं छत्र हरवल. कसबस प्राथमिक शिक्षण जि. प. च्या शाळेत आणि माध्यमिक शिक्षण येथीलच श्री बसवेश्वर विद्यालयात पूर्ण झाल्यानंतर घरच्यांनी याच तालुक्यात असलेल्या मरशिवणी या गावातील युवकाशी त्यांचा विवाह लावला. आणि मूळ नावात वंदना रामराव होणराव असे परिवर्तन झाले. या दाम्पत्यांना पहिलं मूल होताच काही वर्षातच हे जोडपं फुलवळ येथेच स्थायिक होऊन स्वतःचे घर बांधून रहिवासी झाले. त्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी त्यांना दुसरेही पुत्ररत्न च जन्माला आले.
काही वर्षातच याच कुटुंबाचा आधारवड आणि मुलांच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपले आणि अख्ख कुटुंब पोरकं झालं. संसाराचा गाडा चालवत आपल्या दोन चिमुकल्या मुलांना शिक्षणाचे धडे देण्याची सर्वतोपरी जबाबदारी ही वंदना होणराव यांच्या माथी पडली. तेंव्हा वंदना होणराव यांनी रात्रीचा दिवस करत घरकाम सांभाळत सांभाळत शिवणकाम शिकले आणि त्या उत्कृष्ट लेडीज टेलर म्हणून नावारूपाला आल्या. आता त्यांच्याकडे महिलांच्या ब्लाऊज शीलाईचे काम बऱ्यापैकी येत होते, महिलाही मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडेच आवडीने शीलाईसाठी जाऊ लागल्या. घरकाम , मुलांचे संगोपन करता करता कधी ग्राहकांचे ब्लाऊज त्या वेळेवर द्यायच्या तर कधी कधी उशिरही व्हायचा, तरीपण ग्राहक आवर्जून त्यांच्याकडेच आवडीने शिलाईसाठी जातात.
कालांतराने कंधार तालुक्यात अंगणवाडी सेविका नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आणि तालुक्याचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे हे त्या निवड समितीचे अध्यक्ष होते. तेंव्हा त्यांचे सहकार्य आणि वंदना होणरावच्या बौद्धिक कौशल्याने त्यांची फुलवळ येथेच अंगणवाडी सेविका म्हणून त्यांची निवड झाली आणि कुटुंबाचा आधारवड गमावल्यानंतर हे त्यांच्या कुटुंबासाठीचा पहिला आधार निर्माण झाला.
आता संसाराचा गाडा हकण्यासाठी आणि मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी आणखी थोडी आर्थिक भर पडल्याने कष्टाच्या जोडीला चांगली मदत झाली. आईचे अपार कष्ट, रात्रंदिवसची मेहनत आणि लहानपणापासून परिस्थितीची जाणीव करून देत घातलेले संस्कार हे त्यांच्या दोन्ही मुलांनी अंगिकारले व आईच्या संस्काराचे चीज करण्यासाठी त्यांनीही अपार मेहनत घेतली.
मुलांच्या त्याच मेहनतीचे फळ आईच्या आशीर्वादाने फळाला आली आणि वंदना बाईचा लहाना मुलगा सुरज होणराव हा दीड वर्षांपूर्वी इंडियन नेव्हीत दाखल झाला आणि तो इंडियन नेव्हीत दाखल होणारा पहिला फुलवळ चा भूमिपुत्र ठरला . आता या कुटुंबात वंदना बाईचा मोठा मुलगा तेवढा नोकरीपासून वंचित होता तो नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये मेकॅनिकल ब्रँच घेऊन पॉलिटेक्निक करत असतानाच गेल्या फेब्रुवारी महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात पोस्ट ऑफिस मध्ये पोस्ट मास्तर म्हणून रुजू झाला. त्यामुळे या कुटुंबातील तिन्ही सदस्य आज घडीला शासकीय नोकरीवर कार्यरत असून सर्वच्या सर्व सदस्य शासकीय सेवेत असलेले फुलवळ या गावातील एकमेव कुटुंब ठरले आहे.
तेव्हा वंदना होणराव यांच्या दैनंदिन काबाडकष्ट, अपार मेहनती बरोबरच दैवी आशीर्वादने कुटुंबात रंगत आणली. त्यामुळे कुटुंबावर आभाळ कोसळूनही दैवाने साथ दिली आणि आज हे फुलवळ गावातील एकमेव सर्व नोकरवर्ग असलेले कुटुंब ठरले आहे..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.