बांगर यांनी शिष्टाई दाखवत खासदार जाधव यांना चरणस्पर्श करून हस्तांदोलन केले. त्यामुळे सुरुवातीला अनेकांच्या भुवया उंचावल्या.
पाथरी : ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषाने सत्तेतील शिंदे गटाला विरोधकांनी सळो की पळो करून सोडले. संधी मिळताच शिंदे गटातील लोकप्रतिनिधींना ठाकरे गटातील कार्यकर्ते नाकीनऊ आणत आहेत. याचाच प्रत्यय तालुक्यातील देवेगाव येथे सोमवारी (ता. २९) झालेल्या एका लग्न सोहळ्यात आला.
कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचे आगमन होताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे लग्नातील सनईचे (Wedding Ceremony) सुर निमवून राजकीय सूर घुमल्याचे चित्र होते.
राज्यातील सत्ता परिवर्तनात शिवसेनेत उभी फूट पडल्याने असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच भाजप सोबत युती केलेल्या शिंदे गटातील लोकप्रतिनिधींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. शेजारील नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकार आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटात सहभागी झाल्यावर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हेही अतिशय नाट्यमयरीत्या शिंदे गटात सहभागी झाले.
हिंगोली व नांदेड हे दोन्ही जिल्हे परभणीचे शेजारी असल्याने साहजिकच परभणीच्या आमदार, खासदारांकडे लक्ष लागले होते. परभणी (Parbhani) हा सेनेचा बालेकिल्ला असून, येथील दोन्हीही लोकप्रतिनिधी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी कायम असल्याचे दाखवून दिले आहे. शिंदे गटात सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधींना पाहताच उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण होतो. हे सोमवारी देवेगाव येथे झालेल्या एका लग्न सोहळ्यात दिसून आले.
पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील एका लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव व शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे समोरासमोर आले होते. यावेळी बांगर यांनी शिष्टाई दाखवत खासदार जाधव यांना चरणस्पर्श करून हस्तांदोलन केले. त्यामुळे सुरुवातीला अनेकांच्या भुवया उंचावल्या. खासदार जाधव यांनीही त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर ते निघून गेले. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मात्र संधी मिळताच ‘पन्नास खोके एकदम ओके’चा घोष केला. त्यामुळे लग्न सोहळ्याला राजकीय आखाड्याचे स्वरूप आले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.