नवीन नांदेड : सलग १५ दिवस गुवाहाटी ते पोरबंदर असा सायकल प्रवास करून एका प्राध्यापकाने तीन हजार किलोमीटर सायकल चालवली आहे. या माध्यमातून त्यांनी ‘ईस्ट टू वेस्ट’ प्रवास करून ‘सायकल चालवा, तंदुरुस्त राहा’ असा तंदुरुस्तीचा संदेश दिला आहे.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील जैवशास्त्र संकुलाचे संचालक व प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस. पी. चव्हाण यांनी नुकताच भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग एन. एच. २७ यावर आसाममधील गुवाहाटी इथून प्रवास सुरू करून १५ दिवस चार तासात त्यांनी तीन हजार किलोमीटर प्रवास करून गुजरातमधील पोरबंदर शहर गाठले.
यातून त्यांनी विद्यार्थी व युवकांनी ‘सायकल चालवा, तंदुरुस्त राहा’ हा संदेश दिला. तसेच ‘ईस्ट टू वेस्ट’ इंडिया सोलो सायकलिंग करणारे ते मराठवाड्यातील पहिले प्राध्यापक ठरले आहेत. प्रा. चव्हाण हे रोज पहाटे साडेपाच वाजता सायकलिंग सुरू करून संध्याकाळी साडेसहा ते सात वाजता मुक्काम करत होते. यावेळेत दुपारी २० मिनीटे आराम अशी त्यांची दैनंदिनी होती.
दररोज दोनशे ते २२० किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केला. सध्या हिवाळ्याचा हंगाम असल्याने पहाटेच्या दाट धुक्याची प्रवासातील अडचण वगळता वातावरणाबाबत कोणतीच अडचण आली नसल्याचे त्यांनी सांगितले. एन.एच. २७ या महामार्गावर जे गेस्ट हाऊस, धाबे व हॉटेल मिळतील तिथे आहे त्या परिस्थितीत मुक्काम केला.
प्रवासात फक्त शाकाहार घेतला कोणतेच बाटलीबंद पेय, कोल्ड्रिंक्स किंवा बाटलीबंद पाणी त्यांनी वापरले नाही. त्याऐवजी त्या भागातील लोक वापरत असलेल्या अन्न आणि पाण्याचा उपयोग केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात हे सात राज्य पार करताना त्यांच्या सायकलमध्ये व तब्येतीत कोणती अडचण झाली नाही.
योग्य आहार, दररोजचा सराव, दृढनिश्चय, धाडस या बाबी अंगीकारल्यास भारतात एकट्याने लांबचा सायकल प्रवास करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. या धाडसी सायकल प्रवासाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, जैवशास्त्र संकुलातील सहकारी प्राध्यापक आणि विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.