शेतकऱ्यांसाठी टीप्स : उन्हाळ्यात कशी घ्याल पीकांची काळजी

File photo
File photo
Updated on

नांदेड : आगामी काळामध्ये तापमान मोठ्या प्रमाणावर वाढणार असून शेतातील उभ्या पीकांची काळजी घेणे अत्यावश्‍यक असणार आहे. त्यामुळे भाजीपाल्यांसह फळ पिकांची काळजी कशी घ्याल? याविषयी कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख यांनी काही टीप्स दिलेल्या आहेत. 

आंबा 
बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. बागेस सकाळी लवकर, सायंकाळी किंवा रात्री पाणी द्यावे. फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केल्यानुसार रक्षक फळमाशी सापळ्यांचा चार सापळे हेक्टर या प्रमाणात वापर करावा. खाली पडलेली फळे वेचून नष्ट करावीत व बाग स्वच्छ ठेवावी. झाडाखाली जमीन नांगरून घ्यावी.

केळी 
केळी बागेचे उष्ण वाऱ्यापासून बागेच्या दक्षिण व पश्‍चिम दिशेने नेटचा वापर करावा. केळी बागेत खोडांना मातीचा आधार द्यावा. नवीन लागवड केलेल्या व लहान कलमांना सावली करावी. यामुळे कलमांची मर होणार नाही. तसेच बागेत जैवीक आच्छादनाचा वापर करावा. बागेस सकाळी, संध्यांकाळी किंवा रात्री पाणी द्यावे.

भाजीपाला पिके
परिपक्व भाज्या विशेषतः टरबूज आणि खरबूज या फळांची ताबडतोब काढणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे किंवा विक्री करावी. कांदा अवेळी पावसापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित जागी साठवून ठेवावे. भाजीपाला पिकांवर चार टक्के निंबोळी अर्कची फवारणी करावी. तर फळे पोखरणाऱ्या अळीपासून पिकाचा बचाव करण्यासाठी एकरी पाच फिरोमोन सापळे लावावेत. त्यातील ल्युर दर तीन आवठवड्यांनी बदलावेत.

भेंडी
भेंडी पिकाच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा क्लोरॅनट्रॉनिलीप्रोल १८.५ टक्के ईसी २.५ मिली किंवा सायपरमेथ्रीन १० टक्के ईसी१५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के ईसी २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेली भेंडीची काढणी सकाळी लवकर करावी. 

वांगी
शेंडा व फळे पोखरणाळ्या अळीच्या नियंत्रणासाठी ती गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावीत. तसेच चार टक्के निंबोळी अर्क किंवा सायपरमेथ्रीन २५ टक्के ईसी पाच मिल किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के ईसी २० मिली किंवा डेल्टामेथ्रीन एक टक्के, किंवा ट्रायझोफॉस २० मिली १० लिटर पाण्यातून फवारावे.

हळद
काढणी, उकळणी, सुकवणी आणि पॉलीशिंगची कामे प्रगतिपथावर असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार अवेळी पावसाची शक्यता असल्यामुळे पीक उघड्यावर टाकू नये. तसेच काढणी केलेले पीक प्लास्टिकच्या सहाय्याने पावसात भिजू नये म्हणून झाकून ठेवावे

पशुधनाची अशी घ्यावी काळजी
वाढत्या तापमानाचा अंदाज लक्षात घेता पशुधनाच्या शेडच्या पत्र्यास पांढरा रंग द्यावा. पत्र्यावर गवताचे, तुराट्याचे किंवा ऊसाच्या पाचटाचे आच्छादन करावे. 

दुधाळ जनावरे : दुधाळ जनावरांना पिण्यासाठी पुरेसे स्वच्छ व आरोग्यदायी पाण्याची व्यवस्था करावी. तसेच उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी वैरणीवर एक टक्के गुळपाणी आणि ०.५ टक्के मीठ यांचे स्वतंत्र द्रवण करून शिंपडावे.
म्हैसपालन : म्हशींच्या शरीरात गायींच्या तुलनेने तापमान समतोल राखणाऱ्या ग्रंथी कमी असल्यामुळे म्हशींना पाण्यात पोहोण्यास सोडावे. म्हशींना उष्माघातापासून वाचविण्यासाठी अंगावर ओली पोती किंवा कपडा टाकावा.

कुक्कुटपालन : उन्हाळ्यात कुक्कुटपालनगृह थंड ठेवावे. शेडभोवतीभरपूर झाडांची लागवड करावी. शेडच्या छतावर गवताने आच्छादन करावे. त्यामुळे तापमान नियंत्रणात राहील. शेडमध्ये एक्सॉस्ट फॅन लावावेत. त्यामुळे गरम हवा बाहेर फेकली जाईल. फोगर्सचा वापर केल्यास शेडमध्ये थंडावा राहण्यास मदत होईल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.